तुमसर : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून नव्या जोमाने कामाला लागावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरीता राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्वशिला चव्हाण यांनी आता मोर्चा सांभाळला आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मोजक्या कार्यकर्त्यांसाठी तुमसर येथे शिबिर आयोजित करुन त्यांना मार्गदर्शन केले. या शिबिराची माहिती पूर्णत: गोपनीय ठेवण्यात आली होती. केवळ निमंत्रितांनाच याठिकाणी प्रवेश देण्यात आला होता. तुमसर येथे आज, शुक्रवारी सकाळी १० ते ५ या वेळेत मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिरात आगामी निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याविषयी माहिती देण्यात आली. चव्हाण यांच्यासोबत निवडक राजकीय सल्लागार, मिडिया प्रचार व प्रसारविषयक तज्ज्ञ उपस्थित होते. त्यांनी या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आॅक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. याची काँग्रेस श्रेष्ठींनी दखल घेऊन या शिबिरात मंथन करण्यात आले. काँग्रेसने केलेली लोकोपयोगी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविणे, जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणे, निवडणूक प्रचार व प्रचाराचे टप्पे, शेवटच्या दहा दिवसात प्रचारात आक्रमकता आणने यावर सत्वशिला चव्हाण यांनी व तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात भंडारा जिल्ह्यातील ८० व गोंदिया जिल्ह्यातील १२० निवडक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला होता. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे वरीष्ठ पदाधिकारी व काँग्रेसचे आमदार या शिबिरात दिसले नाही. तुमसर पोलिसांनासुद्धा या शिबिराची अधिकृत माहिती नव्हती. (तालुका प्रतिनिधी)
‘मिसेस सीएम’नी दिले काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘बाळकडू’
By admin | Updated: June 28, 2014 00:56 IST