तुमसर : चारगाव (देव्हाडी) येथे पांदण रस्त्याच्या कामावर न जाणाऱ्या मजुरांची नावे मस्टरवर दाखविली आहेत. सर्रास येथे पैशाची अफरातफर करणाऱ्या रोजगार सेवक तथा दोषी कर्मचाऱ्यावर निलंबित करण्याची मागणी प्रकाश वैद्य व ग्रा.पं. सदस्य नाना माहुले यांनी खंडविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.चारगाव येथे भूलचंद बन्सोड ते परसराम सोनवाने यांच्या शेताला जाणारा पांदन रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पूर्णत्वास आला. या रस्त्याच्या कामावर १० मजूर आले नाहीत त्यांची नावे मस्टरवर असून त्यांना मजूरी देण्यात आली. येथे आर्थिक गैरव्यवहार झाले आहे. या प्रकरणात रोजगार सेवक व अधिकाऱ्यांचे संगनमत दिसू नयेते. मागील वर्षी १५ आॅगस्ट २०१३ ला ग्रामसभेत या रोजगार सेवकाला काढण्यात आले होते. येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठराव न घेता त्याला पुन्ह कामावर घेतले. का घेतले याची चौकशी झाली पाहिजे. मस्टर यादीत दहा मजुरांची नावे आहेत. जे या रस्ता कामावर गेले नाही त्यांच्या नावावर अतिरिक्त मजुरी देण्यात आली. सुमारे ३८ हजार रुपयांचा हा गैरव्यवहार आहे. मस्टरवर त्यांचे कामाचे दिवस व मजुरी दिली आहे. काम नाही तर दाम नाही असा शासनाचा नियम असताना येथे मजुरी कशी देण्यात आली. या प्रकरणात रोजगार सेवक व संबंधित पदाधिकारी तथा अधिकाऱ्यांचे संगनमत दिसून येते. चौकशी करून संबंधित रोजगार सेवक तथा अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. तुमसर तालुक्यात रोजगार हमीच्या कामात अनियमितता झाल्याचे आरोप आहे. या कामाची पाहणी व कागदपत्रांची चौकशी येथे एका पथकाद्वारे झाल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
चारगावात रोहयो कामात गैरव्यवहार!
By admin | Updated: August 17, 2014 22:59 IST