पालोरा (चौ.) : दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबाकरीता शानाकडून अन्न धान्यासोबत रॉकेलचा पुरवठा केला जातो. प्रशासकीय मान्यता असलेले परवानाधारक रॉकेल विक्रेते जनतेला रॉकेलचा पुरवठा न करीता गरिबाच्या हक्काच्या रॉकेलचा काळाबाजार करून मालामाल होत आहेत.जनतेला युनिट प्रमाणे रॉकेल न देणे, महिन्याच्या पुर्वीच नो ट्रॉकचा बोर्ड लावणे, पुरवठा कमी असे कारण पुढे सांगून जनतेला वापस पाठविणे असे रॉकेल दुकानदारांकडून केले जात आहे. त्यामुळे गरीब जनतेला अंत्यसंस्कारालाही तेल मिळणे कठीण झाले. संबंधित पुरवठा विभागाचे अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत, असा आरोप जनतेनी केला आहे. केरोसीन हे गरीब कुटूंबाचे महत्वाचे घटक आहे. सध्याला पावसाळा सुरू आहे. विद्युतच्या लंपडावाने तेल नसल्यास संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागते. पवनी तालुक्यात रॉकेलचे परवाने सर्वाधिक किराणा दुकानदाराकडे दिला आहे. कोंढा-कोसरा येथे मोठे मोठे किराणा दुकाने आहेत. यांच्याकडे रॉकेल पुरवठ्याचे परवाने दिले आहेत. येथील दुकानदार ग्रामीण भागातील जनतेला रॉकेलचा पुरवठा करतात. या पाणटपऱ्या, नास्त्याचे दुकाने आहेत. यांना नियमितपणे रॉकेलचा पुरवठा केला जातो. मात्र सामान्य जनतेला रॉकेल दिला जात नाही. ज्यांच्याकडे गॅससिलिंडर आहे, त्यांना तुमचे रॉकेल बंद झाले म्हणून सांगले जाते. एका खाजगी भाज्याची दुकान दाराने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले आहे की, आम्ही किराणा दुकानातून सामान घेतो व त्याच दुकानातून आठ हजार रूपये प्रमाणे तेलाची टंकी घेत असतो. आम्हाला तेल केव्हाही मिळतो असे सांगितले आहे. दर आठवड्याला येथे बाजार भरतो. बाजारात नास्ता विकणारे शेकडो दुकाने असतात. हजारो लिटर मातीचे तेल जाळल्या जाते. एवढा तेल कुठून येतो या संदर्भात चौकशी करणे गरजेचे आहे. या बाबतीत अनेकाकडून तक्रारी दिल्या जातात. मात्र कार्यवाही शुन्य केली जात असल्यामुळे जनतेनी तक्रारी करणे बंद केले आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेनी केली आहे. (वार्ताहर)
बीपीएलधारकांना रॉकेल मिळणे झाले कठीण
By admin | Updated: August 6, 2015 01:48 IST