तुमसर : डोंगरी (बुज) मॅग्नीज खाणीमुळे परिसरातील गावातील नागरिकांचे आरोग्य व जीव धोक्यात आले आहे. ब्लॉस्टींगमुळे घरांना तडे गेले आहे. मजूरांना किमान मजूरी मिळत नाही. येथे अनियमिततेची चौकशीची मागणी जि.प. सदस्य अशोक उईके यांनी केली. दिवसभर या परिसरात भूकंपासारखे धक्के लागत असून परिसरातील वातावरणात धूळच धूळ सर्वत्र दिसते.तुमसर तालुक्यात भारत सरकारच्या दोन जगप्रसिद्ध खाणी आहेत. डोंगरी बु. येथे खुली खाण आहे. या खाण परिसरात १० कि़मी. पर्यंत प्रदुषणाची समस्या बिकट आहे. सर्वत्र धूळ येथे वातावरणात दिसते. दिवभर ब्लॉस्टिंग येथे होते. भूकंपाच्या धक्क्यांचा येथे भास होतो. ४ ते ६ टन दारूगोळा बारूदचा वापर ब्लॉस्टिंगकरिता करण्यात येतो. बाजारटोला, कुरमुडा, बाळापूर या तीन कि़मी. परिसरातील अनेक घरांना तडे भेगा पडल्या आहेत. खाणीतील शेकडो ट्रक मलबा ट्रकने डोंगरी बु परिसरात घातला जातो. २४ तास मॉईल मध्ये ट्रकांची ये-जा सुरू राहते. त्यामुळे सर्वत्र धूळ वातावरणात तरंगतांनी दिसते.मॉईल प्रशासनाने मुख्य कार्यालयाशेजारी दोन मजली इमारत तयार केली. येथून ब्लॉस्टिंग झोन केवळ ४०० ते ५०० मीटर अंतरावर आहे. मुख्य कंत्राटदाराने ही कामे दुसऱ्या कंत्राटदाराला दिली होती. धोकादायक क्षेत्रात दोन मजली इमारत कशी बांधली असा आरोप अशोक उईके यांनी लावला आहे.मॉयल कंत्राटदारांजवळ कामे करणाऱ्या मजूरांना किमान वेतन २२० रूपये देण्यात येत असल्याचा फलकावर लिहीले आहे, परंतु प्रत्यक्षात येथे ८० ते १०० रूपये प्रतिदिन मजूरी देण्यात येत आहे. स्थानिक बेरोजगार आदिवासी बांधवांना येथे रोजगार देण्यात येत नाही. परिसरातील शिकाऊ आयटीआय धारकांना मॉईलमध्ये घेण्यात येत नाही तर परप्रांतीय कर्मचाऱ्यांची येथे संख्या जास्त आहे.मॉईल परिसरातील नागरिकांना असाध्य आजार टी.बी. क्षयरोग, दमा, रुग्णांची संख्या मोठी आहे. जलप्रदुषण येथे आहे. विहीरतील पाणी काळे झाले आहे. येथे कामगारांच्या सदनिका ब्लॉस्टिंग झोनमध्ये असल्याने कामगारही सुरक्षित नाही. यासर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आदिवासी राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम यांच्याकडे जि.प. सदस्य अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, सह शिष्टमंडळाने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मॉईल परिसरात ब्लॉस्टिंगचे धक्के
By admin | Updated: May 10, 2015 00:51 IST