चवथ्या दिवशीही उपोषण सुरूच : जिल्हा प्रशासनासनाची उदासीनताभंडारा : जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीवर तत्काळ आळा घालण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ केला. मात्र चार दिवस उलटूनही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे आज उपोषण कर्त्यांनी काळी फित व काळे झेंडे लावून जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. भंडारा जिल्ह्यातील रेतीघाटावरून क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रक-ट्रॅक्टरमध्ये भरून दिल्या जात आहे. रेती वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. भंडारा शहरात अनेक ठिकाणी कोट्यवधी रूपयांची अवैध रेतीचा साठा जमा केलेला आहे. हा सर्व प्रकार सुरू असतानाही जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहेत. कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. याकरीता अवैध रेती वाहतूक बंद करण्यात यावे, नादुरूस्त रस्ते दुरूस्त करण्यात यावे, रेतीमाफियांच्या संपत्तीची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, ज्या रेतीमाफियांवर तीन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशांवर मोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना जिल्हा बंदी करण्यात यावी, शहरात बेकायदेशीर जमा असलेली रेती शासन दरबारी जमा करावी व त्याचा तात्काळ लिलाव करण्यात यावा, संयुक्त समिती नेमूण अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अवैध गौण खनिज चोरीसाठी वीज धारकास जबाबदार धरणे आवश्यक आहे, त्यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, जिल्ह्यातील रेती उत्खनन करण्यासाठी आतापर्यंत लीज धारकांनी किती मनुष्यबळ लावला, त्याची योग्य चौकशी होवून कारवाई करण्यात यावी, जेसीबीद्वारे रेती उत्खनन करण्याची मनाई असताना कुणाच्या आशिर्वादाने जेसीबीद्वारे उत्खनन करता याची शहनिशा करण्यात यावी आदी मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. निषेध दर्शविणारे निवेदन आज उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. शिष्टमंडळात उपोषणकर्ते सुरज परदेशी, मेहमुद अली, विजय क्षीरसागर, विष्णूदास लोणारे, पुरूषोत्तम कांबळे, दलिराम भुते, त्रिवेणी वासनिक, अजय वासनिक आदी सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)
काळे झेंडे लावून उपोषणकर्त्यांनी केला निषेध
By admin | Updated: June 5, 2015 00:53 IST