काटेबाम्हणीतील प्रकार : सभापतींसह चार शेतकऱ्यांवर गुन्हे दाखलतुमसर : पावसाने दडी मारल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकरी बांधावर आणि नजरा आकाशाकडे लागलेल्या आहेत. पऱ्हे वाचविण्यासाठी बावनथडी प्रकल्पाने पाणी सोडले. परंतु काही शेतकऱ्यांनी कालवा फोडून पाणी पळविल्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. आज शनिवारला, सकाळी १० वाजताच्या सुमारास उपविभागीय अभियंता व त्यांच्या भरारी पथकाने घटनास्थळी भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरुन तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व अन्य चार शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. तुमसर तालुक्यात २९,३०० हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे पऱ्हे पुर्णत: करपले आहे. बावनथडी प्रकल्पातून सध्या शेतकऱ्याच्या पऱ्ह्यांसाठी पाणी सोडणे सुरु आहे. खापाजवळील काटेबाम्हणी शिवारातून उजवा कालवा जातो. या कालव्याला ठिकठिकाणी फोडून त्यात जलवाहिन्या टाकून पाण्याची दिशा बदलविण्यात आली. मागील आठ ते दहा दिवसापासून नियमबाह्यरित्या शेतात नेणे सुरु होते. कालव्या फोडल्याने अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. याबाबत उपविभागीय अभियंत्यांना तक्रार करण्यात आली. उपविभागीय अभियंता निशिकांत पनके व त्यांच्या सहकाऱ्यांनी काटेबाम्हणी शिवारात भेट दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला.उपविभागीय अभियंता पनके यांनी कालवा फोडल्याप्रकरणी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे व अन्य चार शेतकऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तुमसर पोलिसांनी भादंवि ४३०, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. कालव्याची नासधूस करणे, कालव्याचे नियमबाह्य पाणी वळविणे या गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे.कालव्याला ठिकठिकाणी फोडल्याने कालव्याचे मोठे नुकसान झाले असून समोर शेत असलेल्या शेतकऱ्यांना सध्या पाणी मिळणे बंद आहे. या प्रकरणाची प्रकल्प अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. राजरोसपणे कालवा फोडून त्यात जलवाहिन्या टाकल्याने शेतात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसते. पुरावा व चौकशीअंती या प्रकरणात पाच वर्षाची शिक्षेची तरतूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आरोपींचे धाबे दणाणले आहे. याघटनेचा तपास हवालदार के.सी. गिऱ्हीपुंजे करीत आहे. या प्रकरणात कोणती कारवाई होते, त्याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. (तालुका प्रतिनिधी)
‘बावनथडी’चा कालवा फोडला
By admin | Updated: July 12, 2014 23:29 IST