मासळ : शासनाच्या उदासीन धोरणामुळे व आधारभूत धान खरेदी केंद्रावरील दलालांच्या बेजबाबदार धोरणामुळे मासळ परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. चालू उन्हाळी हंगामात मासळ, खैरी, धरतोडा, ढोलसर, बाचेवाडी, परिसरात भरघोस बासमती धानाचे उत्पादन झाले. परंतु शासनाकडून हा बासमती धान केंद्रावर खरेदी करण्याच्या काहीच उपाययोजना नाहीत. त्यामुळे शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत सापडला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडील धान उचल न झाल्यामुळे तसाच पडून आहे. काही काही शेतकऱ्यांकडील धान अत्यल्प भावाने व्यापारी खरेदी करीत आहेत. तर काहींचा बासमती धानाला कोणी विचारत नाही. शेतकरी आर्थिक टंचाईतून बाहेर पडावा व त्याची स्थिती सुधारावी या हेतूने शेतकऱ्यांनी बासमती धानाचे उत्पादन घेतले. परंतु योग्य भाव व बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना मागेल त्या किंमतीत धानाची विक्री करावी लागत आहे. बहुतांशी तर शेतकऱ्यांच्या बासमती धानाला कोणी विचारतच नाही. तेव्हा धान विक्रीसाठी न्यायचा कुठे? हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. अशावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी बासमती धान खरेदी करीता काहीतरी पाउले उचलावी अशी दिपक घुगुसकर, राजगोपाल भुरे, रवि गौरकर, किशोर चेटुले आदी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)
बासमती धान उत्पादक संकटात
By admin | Updated: June 18, 2014 23:56 IST