कोंढा (कोसरा) : गोसे प्रकल्प डाव्या कालव्याच्या बाजूला सोमनाळा गावालगत पांदण रस्ता होता. तो पांदण रस्ता कालव्यामुळे नष्ट झाला. कालवा बांधून अनेक वर्षे झाले, पण सोमनाळा येथील शेतकर्यांना पांदन रस्ता बांधून न दिल्याने शेतकरी पाच वर्षापासून रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.पवनी तालुक्यात महत्त्वाकांक्षी इंदिरा सागर प्रकल्प आहे. या प्रकल्पात अनेक शेतकर्यांच्या जमिनी गेल्या. शेतात जाण्यासाठी जे पांदण रस्ते होते ते नष्ट झाले. जलसंपदा विभागाने शेतकर्यांचे पांदण रस्ते बांधून देण्याचे ठरविले आहे. पण ते अधिकारी, कर्मचारी यांच्या कामचुकारपणामुळे काम होताना दिसत नाही. सोमनाळा येथील शेतकर्यांच्या शेतात जाणारा पांदण रस्ता डाव्या कालव्यात नष्ट झाला. त्यामुळे शेतकर्यांना प्रचंड अडचण जात आहे. सरकारी पांदण रस्ता तयार करण्यासाठी रमेश गिरडकर व शेतकर्यांनी उपविभागीय अभियंता गोसे खुर्द डावा कालवा चकारा यांना अर्ज केले. त्यांनी पांदण रस्ता बांधून देण्याचे आश्वासन दिले, पण पाच वर्षापासून रस्ता तयार झाला नाही.डाव्या कालव्याच्या बाजूला ड्रेनमध्ये पाईप टाकून रस्ता तयार करण्याचे आश्वासन मिळते. पण अजूनपर्यंंत काम पूर्ण झाले नाही. या शेतीच्या हंगामात पांदण रस्ता पूर्ण होईल म्हणून शेतकरी अधिकार्यांना भेटत आहेत. पावसाळा सुरु होण्याअगोदर काम करुन देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता गोसे खुर्द डावा कालवा, वाही, पवनी यांनीदेखील दिले. डावा कालवा उपविभाग चकारा येथील कनिष्ठ अभियंता देवतळे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी पाईप कार्यालयाकडून मिळेल. शेतकर्यांनी जेसीबी मशीन लावून घेऊन जावे यासाठी आम्ही खर्च देणार नाही असे सांगितले.शेतकर्यांच्या शेतात जाणारे पांदण रस्ते कालव्यात नष्ट झाले ते बांधून देण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची आहे. पण याकडे लक्ष देण्यास व गंभीरतेने लक्ष देण्यास कोणीही अधिकारी तयार नसल्याचा शेतकर्यांचा आरोप आहे. तरी पावसाळ्यापूर्वी सोमनाळा शेतशिवारातील पांदण रस्त्याचे काम न केल्यास शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा सोमनाळा येथील शेतकर्यांनी दिला आहे.(वार्ताहर)
पांदण रस्ता बांधून देण्यास टाळाटाळ
By admin | Updated: June 3, 2014 23:53 IST