निवडणुकीची शक्यता : जिल्हा उपनिबंधकाचा आदेशभंडारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला कार्यकाळ पूर्ण झाल्याचे व मुदतवाढ मिळण्याच्या संदर्भाने प्रस्ताव प्राप्त न झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी एपीएमसीवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. सहाय्यक निबंधक पी.एन. शेंडे यांच्याकडे प्रशासकाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी आदेशान्वये स्पष्ट केले आहे.संबंधित समिती ही महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनिमयन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ तरतुदीनुसार स्थापित झालेली आहे. त्यामुळे बाजार समितीला कायद्यातील तरतूदीनुसार कामकाज करणे बंधनकारक आहे. बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत २१ आॅगस्ट २०१३ रोजी संपुष्टात आलेली आहे. त्यानंतर शासनाने मुदतवाढ दिली होती. मात्र त्यानंतर संचालक मंडळातर्फे निवडणूक घेण्यासंदर्भाने प्रस्ताव देण्यात न आल्याने बाजारसमितीचे कामकाज पाहण्याकरिता उक्त कायद्यातील कलम १५ (अ) (१) (ब) अन्वये बाजारसमितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती
By admin | Updated: September 11, 2014 23:16 IST