साकोली : केंद्र सरकारने लोकांना भुलथापा देवून महागाई वाढवून जनतेचा विश्वासघात केला. ही महागाई सरकारने मागे घ्यावी यासाठी आज तहसील कार्यालयासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन सेना, शेतकरी व शेतमजूर संघटना साकोली तालुका यांच्यावतीने धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना तहसील दारामार्फत निवेदन दिले.या निवेदनानुसार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सरकारने नागरिकांशी खोटे बोलून महागाई कमी करण्याचे वचन देवून लोकांची दिशाभूल केली. एका महिन्यात डिझेल, रॉकेल, रेल्वे भाडेवाढ, साखरेची किमती वाढवून नागरिकांना अडचणीत आणले.संपुआ सरकारच्या काळात प्रत्येक ऋतुत कमीत कमी २०० ते २५० रूपये केंद्राच्या निर्धारित कृषी मुल्यात धानाच्या प्रतिक्विंटलवर भाववाढ केली जात होती. परंतु नवीन सरकारने मात्र धानाला प्रतिक्वींटल फक्त ५० रूपये वाढ देवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. खतांच्या व बियाणावरील सबसीडी काढल्यामुळे खते व बियाणे महाग केली, डिझेल, रॉकेल, साखर व र ेरेल्वेच्या तिकीटामध्ये भाववाढ करून जनतेवर बोझा वाढविला. या दरवाढीचा निषेध करीत भाववाढ सरकारने मागे घ्यावी, असे या निवेदनात नमूद आहे.या घटनेआंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, पंचायत समिती सदस्य मदन रामटेके, तालुका अध्यक्ष मार्तंडराव भेंडारकर, शहर अध्यक्ष अश्विन नशीने, प्रदीप मासूरकर, प्रभाकर सपाटे, दिलीप मासूरकर, तालुका अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे, विजय रामटेके, नरेश नागरीकर, विजू दुबे, ओम गायकवाड, भिवा वासनिक, तारा, जया भुरे, सविता शहारे, कौशल, शैलेश गजभिये आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
महागाईच्या विरोधात साकोलीत सर्वपक्षीय धरणे
By admin | Updated: June 28, 2014 00:58 IST