इंद्रपाल कटकवार
भंडारा : मागील वर्षीही शाळांनी नाममात्र फी कमी करून पालकांकडून बाकीचे पैसे उकळून घेतले. तोच प्रकार यंदाही होत असून, पुस्तकांसाठी पालकांना फोन करणे सुरू झाले असून, काही दिवसांनी फीसाठी फोन करण्यास सुरुवात होईल. कोरोनाच्या कठीण समयीही शाळांकडून काहीच दयाभाव न दाखविता पैसे कमाविण्याचा कारभार सुरू आहेत. मात्र, यावर कारवाई करण्यासाठी अधिकारीच नाही. शिक्षण विभागाचा डोलारा प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला. जेवणाचे संकट उभे असतानाही शाळांकडून मात्र माणुसकी न दाखवता फी वाढ व फीसाठी तगादा लावला जात आहे. शिक्षण विभागातील १७ पैकी १३ पदे रिक्त आहेत. अशात आता पालकांनी तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न पडला आहे. शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची पदे रिक्त आहेत.
बॉक्स
उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारींची जबाबदारी
विशेष म्हणजे, शिक्षण विभागातील पदे रिक्त असतानाही पालक किंवा शिक्षकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उपशिक्षणाधिकाऱ्यांनाच तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे शिवाय आलेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण करून लगेच प्रकरण मार्गी लावले जात आहे. त्यामुळे पालकांना शिक्षण शुल्क असो वा अन्य काही तक्रार असल्यास त्यांनी थेट तक्रार करावी शिवाय शिक्षण विभागाशी असलेल्या अन्य तक्रारीही कराव्यात, त्यांचे वेळेत निराकरण केले जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर यांनी सांगीतले. कोरोनाकाळात शिक्षण विभागाकडे तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दिशानिर्देशही दिले आहेत. सध्या अन्य कामांचाही व्याप वाढल्याचे दिसून येते.
बॉक्स
पालक म्हणतात, तक्रार करायची कुठे ?
कोरोनाकाळात शाळा बंद असून मुले एक दिवसही शाळेत गेले नाहीत. शाळांकडून फीसाठी तगादा लावला जातो. मागील वर्षी तसेच झाले व अखेर मोजकी सूट देऊन शाळांनी बाकीची फी वसूल केली. यंदाही तोच प्रकार घडणार आहे. यावर पक्की कारवाई होणार यासाठी तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न पडतो.
- दीपक भूते (पालक)
पाल्यांच्या शिक्षणासाठी पालक काटकसर करत आहेत. मात्र, कोरोनामुळे पाल्य शाळेत गेले नसतानाही शाळांकडून फी घेतली जात आहे, हे चुकीचे आहे. मागील वर्षी तसेच झाले, आताही तसेच होणार आहे. आज शिक्षण एवढे महागडे झाले आहे की, ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही तरीही आपल्याला मात्र तक्रार करायची कुणाकडे हेच समजत नाही.
भूपेंद्र रामटेके (पालक)
शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...
जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा कारभारच प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे. अशात शिक्षकांच्या तक्रारी आम्ही प्रभारी अधिकाऱ्यांकडे मांडतो. शिक्षणाधिकारी नियमित असल्याने आमच्या तक्रारी, समस्या ऐकून घेतात. परंतु गटशिक्षणाधिकारी यांची पदे रिक्त आहेत. शासनाने रिक्त पदे भरण्यासाठी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.
- रमेश सिंगनजुडे, जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ.
जिल्ह्यातील शिक्षण विभागात असलेल्या रिक्त पदांमुळे सर्व कारभार प्रभारींच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे तक्रार करूनही निर्णय वेळेवर होत नाही. परिणामी समस्या प्रलंबित राहतात. तालुका पातळीवर कायम अधिकारी येत नाही तोपर्यंत हीच स्थिती राहणार असून, यासाठी पदभरती करणे गरजेचे आहे.
-ज्ञानेश्वर दमाहे, जिल्हा सरचिटणीस, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ.