भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मागासवर्गीय कर्मचारी व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा भंडाराची सभा जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी परिषद कक्षात घेण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यातील विभाग प्रमुखांची उदासिनता लक्षात घेता मागासवर्गीय कर्मचार्यांच्या प्रश्नांकडे आणि समस्यांकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर कार्यवाही करणार असल्याचे निर्देश दिले.या सभेत जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे अप्पर जिल्हाधिकारी मिलिंद बंन्सोड, महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा कोषागार अधिकारी अतुल गायकवाड, पोलीस विभागाचे विभाग प्रमुख धात्रक तसेच अँड.विलास कानेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवतळे, महसूल विभागाचे मोहनकर, एम्लायमेंट ऑफीस, परिवहन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय कार्यकारिणीचे उपमहासचिव सुर्यकांत हुमणे, जिल्हाध्यक्ष शेखर बोरकर, सचिव राजकुमार मेश्राम, पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश आलेवार, जिल्हा नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा हेमलता भिमटे, सचिव जयश्री मस्के, प्राचार्य अनमोल देशपांडे, संघटनेचे कोषाध्यक्ष दिनेश कोटांगले, सहसचिव शैलेंद्र जांभूळकर, मुख्य संघटन सचिव भिमराव मेश्राम पूर्व प्रशासन अधिकारी आर.एम. मेश्राम, कर्सल मस्के, नरेंद्र भोयर आदी संघटनेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यसचिवांकडे होणार्या सभेत विषय हाताळताना १ मे १९९९ पासून बिंदू नामावली प्रमाणे संवर्गनिहाय मंजूर पदे, रिक्त पदे, भरलेली पदे, आरक्षित पदे संबंधाने माहिती देणे, भंडारा-गोंदिया जिल्हा विभागणी दि. १ मे १९९९ पासूनचे रोस्टर तसेच अनुकंपामध्ये नियुक्त केलेल्या जेष्टतेनुसार कर्मचार्यांची संपूर्ण माहिती, वरिष्ठ वेतनश्रेणी निवडश्रेणी, सेवाजेष्टता, पदोन्नती, बदल्या प्रकरणे निकाली काढणे, नियोजनबद्ध अपंग उमेदवाराच्या ३ प्रतिशत प्रमाणे भरती संबंधाने माहिती घेणे, शासन परिपत्रकानुसार संघटनेचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या बदल्या जिल्हा मुख्यालयाजवळ असणे आवश्यक आहे आदी बाबीविषयी माहिती जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांकडून त्वरीत संघटनेला उपलब्ध करून देणे, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाला संलग्न कर्मचारी हे पटवारी संघ बँक कर्मचारी संघटना, आरोग्य संघटना, शिक्षक संघटना, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना वनविभाग संघटना, महसूल संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, सेवानवृत्त संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा नर्सेस संघटना तसेच पोलीस विभागातील आदींशी संबंधित कर्मचारी यांची संयुक्त संघटना असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना कक्ष उपलब्ध करून द्यावे आणि मागासवर्गीय कर्मचार्यांच्या प्रश्नांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांना स्पष्टीकरण मागवून त्यांच्या सेवापुस्तीकेवर नोंदी घ्याव्यात, असे विषय महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सुर्यकांत हुमणे व जिल्हाध्यक्ष शेखर बोरकर यांनी लावून धरले. सभेअंती शेखर बोरकर यांनी जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा उपस्थित विभाग प्रमुखाचे आभार मानले. (नगर प्रतिनिधी)
समस्यांकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर होणार कारवाई
By admin | Updated: June 3, 2014 23:52 IST