देवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यातील १,१०० शाळेतील १ लाख २१ हजार ११४ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले असून, पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यासाठी नियोजन करण्यात येते. यावर्षीसुध्दा प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. पाठ्यपुस्तके वितरीत करणाऱ्या तालुकानिहाय शाळांमध्ये भंडारा २१०, लाखांदूर ११४, लाखनी १२९, मोहाडी १२८, पवनी १७१, साकोली १३७ व तुमसर तालुक्यातील २११ शाळांचा समावेश आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, खासगी अनुदानित शाळा, अंशत: अनुदानित शाळा आणि नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये पाठ्यपुस्तके वितरित करण्यासाठी शिक्षण विभागाने शासनाकडे मागणी केली होती. ६ लाख ८७ हजार ११४ पाठ्यपुस्तकांच्या मागणीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियान विभागाला ६ लाख ३७ हजार २१८ पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी संख्या ही मराठी माध्यमाची आहे. त्या खालोखाल सेमी इंग्रजी माध्यम आणि उर्दू आणि हिंदी माध्यमाचे विद्यार्थी आहेत. शाळेची पहिली घंटा २७ जून रोजी वाजणार आहे. १७ जूनपर्यंत शाळांना ही पाठ्यपुस्तके वितरित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये अद्यापपर्यंत पुस्तके पोहोचले नसल्याचे चित्र आहे. शाळांना तातडीने पुस्तके पोहोचविण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच संबंधित शाळांनासुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पुस्तक वितरणाचे काम सुरू होईल, असा विश्वास दिला आहे.मागणी नोंदविल्याप्रमाणे शासनाकडून ९२.७४ टक्के पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. या पुस्तकांचे शाळांना लवकरच वितरण करण्यात येईल. त्यानुसार नियोजन करण्यात आले असून, शाळांना त्यांची पुस्तके तहसील कार्यालयातून घेऊन जाण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. वीरेंद्र गौतम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारीसर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषद,भंडारा.
१.२१ लाख विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके
By admin | Updated: May 23, 2016 00:34 IST