Shree Swami Samarth Charitra Saramrut Parayan Rules And Methods: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या कालातीत शुभाशिर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामी चरणी लीन होत असतात. दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहेत. स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा, स्तोत्रे, श्लोक, मंत्र असून, भाविक याचा लाभ घेत असतात. श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत. याचे नित्यनेमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते, अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायची इच्छा असल्यास कसे करावे, योग्य पद्धत कोणती, याची फलश्रुती काय सांगितली आहे, ते जाणून घेऊया...
अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची न चुकता दररोज सेवा करणे कोट्यवधी भाविक आहेत. अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात. आनंद, दुःख स्वामींना सांगतात. अडचणी-समस्या सांगतात. यश-प्रगती झाली तर स्वामी चरणी अर्पण करतात. स्वामींचीच ही कृपा आहे, अशी भावना कायम ठेवून स्वामी सेवा अविरतपणे सुरू ठेवतात. स्वामींवर सगळी काळजी, चिंता सोडून आपण आपले कर्तव्य, काम अगदी प्रामाणिकपणे अनेक जण करत असतात. स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत याचे नियमितपणे पारायण करत असतात. परंतु, ज्यांना पहिल्यांदा पारायण करायची इच्छा आहे, त्यांनी सर्वप्रथम याचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसे करावे, कधी सुरू करावे, पारायण झाल्यानंतर काय करावे अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार संकल्प बद्ध होऊन स्वामी सेवा सुरू करावी
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे?
वास्तविक पाहता स्वामींच्या सेवेसाठी वेळ काळ पाहण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले जाते. असे असले तरी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसांचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची ३, ७, ११ आणि २१ अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल.
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण वेळ आणि पद्धत
सकाळीच, स्नानादि कार्ये झाल्यावर नित्याची देवपूजा करून, भोजनापूर्वी पारायण करावे. वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावे. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. नमस्कार करावा आणि पारायणाची सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीत जसे सांगितले असेल, तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी, एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी.
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण प्रारंभी काय करावे?
उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत, हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा, म्हणून श्रींची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी ताम्हनात सोडावे. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे.
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण व्यवस्था कशी करावी?
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. आसनावर बसून श्री स्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन झाल्यावर स्वामींना गंध, हळद-कुंकू आणि फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावे ग्रहण करावा. पारायणाची सांगता झाल्यावर यथाशक्ती दान करावे.
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण विशेष नियम
वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा. पारायण करताना भक्तीभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. वादविवाद, भांडण, तंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता.
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण फलश्रुती
पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. कुटुंबात सुख-समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होते.
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण लहान मुलांनी केले तर चालते का?
लहान मुलांनी पारायण केले तर चालते. पारायणामुळे मुलांमध्ये अनेक चांगले गुण विकसित होण्यास मदत होते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. नैतिक मूल्ये शिकतात. भाषा आणि शब्दसंग्रह सुधारतो. आत्मविश्वास वाढतो. धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृत होतात.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
॥ श्री स्वामी समर्थ ॥