लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत गरोदरपणापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जातात. यासाठी १५० दिवसांच्या आता शासकीय आरोग्य संस्थेत नोंद करणे आवश्यक असते. गतवर्षी केवळ ३२ टक्के महिलांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या योजनेची पूर्णपणे जनजागृती झाली नाही की महिला लाभ घेत नाहीत, हा प्रश्न कायम आहे. मागील दोन वर्षांत १५ कोटी ८३ लाख रुपयांचा निधीही वाटप करण्यात आला आहे.
जिल्ह्यात खासगी रुग्णालयांपेक्षा शासकीय रुग्णालयांमध्ये होणाऱ्या प्रसूतीचा टक्का जास्त आहे. ही समाधानकारक बाब असली तरी मागील काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयांतील हा टक्का कमी होत चालल्याचे दिसत आहे. दरम्यान, मातृवंदना योजनेचा लाभ देण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आलेल्या महिलांना मार्गदर्शन करणे आवश्यक असते. परंतु, तसे होत नाही.
शासकीय रुग्णालयात प्रसूती, तरी लाभ नाही !
जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय या संस्था मोठ्या आहेत. येथे प्रसूतीचा आकडाही मोठा असतो. परंतु गरोदरपणात तपासणी झालेल्या महिलांना पूर्णपणे माहिती दिली जात नसल्याने त्या या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. तसेच काही महिलांची आर्थिक परिस्थिती सदृढ असल्याने याचा लाभ घेत नाहीत. परंतु अशा महिला केवळ बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. त्यामुळे या योजनेची जनजागृती आणखी करण्याची गरज आहे.
n लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड
n लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते
n गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसांच्या आत नोंद
n शासकीय संस्थेत गरोदर काळात तपासणी
n बाळाची जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण
उपरोक्त अटींची पूर्तता केल्यानंतर ३० दिवसात लाभाची रक्कम अदा केली जाते.
लाभासाठी यांना साधा संपर्क
आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका, आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधून लाभ घेता येतो.
काय म्हणतात महिला...
साधारण सहा महिन्यांपूर्वी माझ्या नातेवाईक असलेल्या मुलीची जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली होती. गरोदरपणातही एक दोन वेळा तपासणी केली. परंतु आम्हाला कोणीच या योजनेची माहिती दिली नाही. त्यामुळे या याेजनेचा लाभ मिळाला नाही.
- आशाबाई सानप, बीड
प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदरपणा तपासणीसाठी गेल्यावर लगेच माहिती दिली. तसेच गावातही आशा, अंगणवाडीताईंनी याची माहिती दिली. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतला. परंतु इतर महिलांनाही लाभ मिळावा यासाठी जनजागृती करावी.
- मनीषा शिंदे, वडवणी