धनगर समाजातर्फे निषेध
बीड : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा धनगर समाज निषेध व्यक्त करीत असल्याची माहिती शिवसंग्रामचे ओबीसी नेते शिवराम शिरगिरे यांनी दिली आहे. आमदार पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद येत्या पावसाळी अधिवेशनात पडल्याशिवाय राहणार नाहीत. धनगर समाजाचा आवाज कोणीही दाबू शकत नाही, असे ते म्हणाले.
रस्त्यावर अंधार
बीड : येथील सहयोगनगर स्टेडियम रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे अंधार पसरला आहे. अंधारामुळे अपघात होत आहेत. कुत्र्यांचाही वावर वाढला असून अनेकांचा त्यांनी चावा घेतला आहे.
संथगतीने ड्रेनेजचे काम
बीड : जिजामाता चौकातील काही ठिकाणी भूमिगत गटार योजनेचे काम चालू आहे. रस्ता खोदून ठेवला असून पावसामुळे चिखल होत आहे. हे काम अतिशय संथगतीने चालू आहे. उलटसुलट कामामुळे रहिवाशांना त्रास होत आहे.
आयुक्तांकडून विकासकामांची पाहणी
आष्टी : आष्टी शहरातील विविध विकासकामांची पाहणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी १ जून रोजी केली. अहमदनगरकडे जात असताना तसेच कृषिदिनाचे औचित्य साधून मुक्तगाय गोठा तसेच आष्टी शहरातील विविध विकासकामांची पाहणी करून केंद्रेकर यांनी आमदार सुरेश धस यांच्या कार्याचे कौतुक केले.