परळी : शहरातील व्यापाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अँटिजन टेस्ट न करता, दुकाने चालू ठेवल्यास त्यांच्यावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार, परळी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष व परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी तलाठी, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी व पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांची चार पथके नेमून व्यापाऱ्यांनी केलेल्या अँटिजन टेस्ट प्रमाणपत्राची खात्री केली जात आहे.
१६ मार्चपासून हे पथक शहरातील विविध विभागांतील दुकानांवर चौकशी करत आहेत. त्यामुळे दोन दिवसांत येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर केंद्रावर अँटिजन टेस्ट करण्यासाठी व्यापाऱ्यांची गर्दी होत आहे. मंगळवारी व बुधवारी तपासणी साठी व्यापाऱ्यांची रांग लागली होती. गर्दी होत असल्याने, या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आला. शहरातील मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर ते एकमिनार चौक, गणेशपार, वैजनाथ मंदिर परिसर, तळविभाग ते जलालपूर, उड्डाणपूल, इटके चौक, आझाद चौक ते बस स्टँड, हडबे हॉस्पिटल, आझाद चौक ते शहर पोलीस ठाणे भागात नप अधिकारी कर्मचारी व पोलीस, तलाठ्यांचे पथक व्यापाऱ्यांना अँटिजन टेस्टबाबत विचारणा करणे सुरू केले आहे. आतापर्यंत शहरातील ५० टक्के व्यापाऱ्यांनी अँटिजन टेस्ट केल्याचे सांगण्यात आले.
===Photopath===
170321\img20210317115711_14.jpg
===Caption===
परळीत अँटिजन टेस्टसाठी व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून केंद्राबाहेर रांग लागलेली होती.