बीड : जिल्ह्यात मुख्य व नगदी पीक म्हणून कापूस या पिकाकडे शेतकरी वळले होते. मात्र, मागील काही वर्षांत कापूस पिकाचे होणारे उत्पादन व खर्च याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे सोयाबीन या तेल पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला असून, मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचा पेरा केला जात आहे. याच दरम्यान मात्र पारंपरिक तेलबिया म्हणून ओळखले जाणारे सूर्यफूल-करडी-जवस यासह इतर तेलबियांचा पेरा अतिशय कमी क्षेत्रावर होत असल्याचे चित्र आहे, तर यापैकी काही पिके तर जिल्ह्यांतून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
बीड जिल्ह्यात खरीप हंगामात सूर्यफूल हे मुख्य पीक होते. मात्र, त्यानंतर कापूस पिकामुळे चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळू लागला, त्यानंतर मागील दशकात सोयाबीन या पिकाचा पेरा करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली. सोयाबीन पिकास मिळणारा चांगला भाव, कापसाच्या तुलनेत करावे लागणारे कमी कष्ट व सोयाबीन निघाल्यानंतर रबी हंगामातील पिकाच्या लागवडीसाठी मिळणारे क्षेत्र यामुळे सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळले आहेत. त्यामुळेचे २०२० खरीप हंगामात कापूस पिकाच्या बरोबरीने म्हणजेच २ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा करण्यात आला आहे. पुढील हंगामात सोयाबीन पिकाचे क्षेत्र कापूस पिकापेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तेलपीक पेरणी क्षेत्रफळ
पीक २०१८-१९ २०१९-२० घट वाढ (हेक्टरमध्ये)
सोयाबीन २१७७९१ २४२००० ०० २४२०९
सूर्यफूल ४९ ३० १९ ००
करडी ६२१ २१० ४११ ००
जवस १२९ ४२ ८७ ००
इतर तेलबिया ५७६ ३७९ ०० १९७
करडी सूर्यफूल हद्दपार
करडीचे तेल घाण्यावर गाळून नैर्सर्गिकरीत्या निघालेले तेल ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरले जात होते. मात्र, मागील काही वर्षांत करडीचा पेरा कमी झाला आहे, तर सूर्यफूल या पिकाचीदेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे सूर्यफूल व करडी हे पीक जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नगदी पिकांचे वाढलेले क्षेत्र व सूर्यफूल या पिकावर झालेला रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सूर्यफूल-करडी यासह इतर तेलपिकांचा पेरा घटला आहे. सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन होत असल्यामुळे त्याचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (प्रभारी)
शेतकऱ्यांना जे परवडते तो बदल शेतात करणे गरजेचे आहे. त्यामुळे सूर्यफूल व करडीसारखी पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी आहारात वापरण्यासाठी असलेले तेल हे करडीचा घाणा गाळून वापरावे, जेणेकरून बाजारातील भेसळयुक्त तेलापासून बचाव होईल व करडीचे क्षेत्रदेखील वाढेल.
शिवराज जगताप शेतकरी