बीड : देशावर कोरोनाने सावट असताना आता बर्ड फ्लूचे संकट आले आहे. परभणी जिल्ह्यात कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे बीड जिल्हा पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे. सर्व पोल्ट्री चालकांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत असून जिल्ह्यात ११ पथके नेमण्यात आली आहेत.
कोरोनामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. नागरिकांसमोर विविध समस्यांचा डोंगर उभा आहे. त्यातच देशाच्या काही राज्यांत बर्ड फ्लू आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात कोंबड्यांचा झालेल्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. तसेच पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे ११ कावळ्यांचा गुरुवारी (दि. ७) मृत्यू झाला होता. त्या कावळ्यांच्या मृतदेहांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील पोल्ट्रीचालक व कोंबड्या पाळणाऱ्या नागरिकांना या रोगाची लक्षणे व उपाययोजना या संदर्भात जनजागृती केली जात आहे. तसेच पक्ष्याचा मृत्यू झाला तर, त्याची माहिती संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला देण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभाकडून दक्षतेचा इशारा
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पोल्ट्रीचालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. या आजाराबाबत घ्यावयाची काळजी व उपाययोजना याविषयी माहिती दिली जात आहे.
एखादा पक्षी आजारी असेल तर, त्याला इतर पक्ष्यांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. शिवाय परिसर निर्जंतुक करावा.
पक्ष्यांमध्ये कोणताही आजार दिसून येत आला, तर तत्काळ संबंधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपचार घेणे गरजेचे आहे. पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित नसेल तर किंवा उपचारासाठी येण्यास नकार दिला तर, त्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर करावी.
प्रतिक्रिया
जिल्ह्यात जनजगृती व दक्षता म्हणून ११ पथके तयार करण्यात आले आहेत. अद्याप कोंबड्यांचा मृत्यूची घटना घडलेली नाही. मुगगाव येथे मृत झालेल्या कावळ्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजेल. मात्र, पक्ष्याचा मृत्यू किंवा आजारपण याविषयी नागरिकांनी तत्काळ पशुविभागाच्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
डॉ. रवी सूर्यवाड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, बीड