लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : तालुक्यातील धुनकवाड येथील भूमिपुत्र राम भीमराव यादव यांची सैन्यदलात ज्युनिअर कमिशन ऑफिसर म्हणून पदोन्नती मिळाली आहे. सैन्यदलात आपल्या विविध पैलूचे दर्शन घडवत अत्यंत कष्टाने गावच्या भूमिपुत्राला पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षापासून ते आर्मीमध्ये शिपाई या पदावर त्यांनी काम केले नौकायान या स्पर्धेत ४ सुवर्णपदक, ९ कांस्यपदक, एक रजतपदक मिळवत आपली चमकदार कामगिरी सुरूच ठेवली. २०११ ते २०१८ पर्यंत प्रत्येक नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये हे मेडल मिळवल्यानंतर आर्मी हवालदार म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. तर नुकत्याच झालेल्या जेसीओ या परीक्षेत त्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेत त्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. या परीक्षेत १४ विषय असतात. २०० गुणांची ही परीक्षा असते. या परीक्षेत १७ सैनिकांनी भाग घेतला होता. यापैकी फक्त दोनच सैनिकांना यश प्राप्त करता आले. यात धुनकवाडचे भूमिपुत्र राम यादव यांनी मानाचा तुरा रोवला. ही पदोन्नती मिळवण्यासाठी पराकाष्ठा करावी लागते. परंतु राम यादव यांनी मात्र कमी वयात ३१ व्या वर्षीच मिळाली यश प्राप्त केले. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास दृढ करीत स्वकर्तृत्वाने त्यांनी यश मिळविले.
सध्या राम यादव यांनी लद्दाख येथील सियाचीन ग्लेशियर या १८ हजार ९०० फुट एवढी उंची असलेले हे जगातील सर्वात उंच रणक्षेत्राच्या ठिकाणी तीन महिने कर्तव्य बजावले आहे. येथे शत्रूशी नव्हे तर वातावरणाशी युद्ध असते. ऑक्सिजन पातळी अत्यंत कमी असते. त्यामुळे श्वास घेणे कठीण असते. या सेवेबद्दल त्यांना ‘ओपी मेघदूत मेडल’ मिळाले आहे. याआधीही हैदराबाद,बेंगलोर, कर्नाटक,उत्तराखंड व आसाम आदी ठिकाणी नोकरी केली. दहा वर्ष आर्मी स्पोर्ट्समध्ये घालवले. भूमिपुत्र राम यादव यांची कामगिरी धुनकवाड आणि परिसरातील तरूणांसाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे.
सत्काराने भारावलो
जेसीओ परीक्षेत मी उत्तीर्ण झालो. सुटीवर जन्मभूमीत आल्यावर ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराने मी भारावून गेलो. अनेक वेळा मी केलेल्या कार्याचा ग्रामस्थांनी गौरव करून मला प्रोत्साहित केले. गावातील प्रत्येकाने आपल्या मुलाकडे लक्ष देऊन त्यांना खेळाची आवड निर्माण करावी. खेळामुळेच मी या पदापर्यंत पोहोचलो आहे. - राम यादव.
===Photopath===
170621\17_2_bed_1_17062021_14.jpeg
===Caption===
राम यादव