वाहतूक कोंडीचा त्रास
बीड : शहरातील भाजी मंडईत वर्दळ वाढली असून, येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केली जात नसल्याचे दिसत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
सीसीटीव्हीची मागणी
गढी : येथे बीड, गेवराई व माजलगावला जोडणाऱ्या चौकात सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या रस्त्यावर दिवस-रात्र वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपासून छोटे-मोठे अपघात होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
रस्त्याची दुरवस्था
बीड : शहरातील चक्रधरनगर, शिंदेनगर भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या भागामध्ये मुरूम टाकण्यात आला आहे. याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्याचे डांबरीकरण करावे किंवा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी आहे.
वाहतुकीला अडथळा
तेलगाव : येथील चौफाळा परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे कधी कधी वादाचे प्रसंगदेखील उद्भवतात. याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ही वाहने हटविण्याची मागणी होत आहे.