बीड : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यात यावे, या मागणीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे संपूर्ण राज्यात शनिवारी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला बीड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी आंदोलनामुळे जिल्हा दणाणून गेला होता. यावेळी आंदोलकांंनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
परळी येथे खासदार प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन झाले. अंबाजोगाई येथे आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, आष्टीत आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले. माजलगाव येथे रमेश आडसकर व माजी आमदार मोहनराव जगताप यांनी दोन ठिकाणी रास्तारोको केला. गेवराईत आमदार लक्ष्मण पवार, धारूरमध्ये डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शिरूरकासार व वडवणी येथेही ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलन शांततेत पार पडले.