बीड : जिल्ह्यात कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार नागरिकांच्या जीवावर टपल्याचे उघड झाले आहे. प्रत्येक १०० रुग्णांमागे १७ लोकांचा जीव हा आजार घेत आहे. ही बाब चिंताजनक असली तरी आतापर्यंत ७७ रुग्णांना ठणठणीत करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. सध्या अंबाजोगाईत ६६, तर बीडमध्ये ४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात ८ एप्रिल रोजी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद बीड आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. या कोरोनाने प्रशासन, शासन आणि जनता हतबल झाली होती. कोरोनाने थैमान घातलेले असतानाच पुन्हा म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने यात आणखी भर टाकली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत गेली. रविवारी जिल्ह्यात १९३ रुग्णांची नोंद झाली होती. यात आतापर्यंत ३४ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाचा मृत्यूदर हा टक्के आहे, तर म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर हा तब्बल १७ टक्के आहे. या आजारावरील उपचाराचा खर्चही सामान्यांना न परवडणारा आहे. सध्या जिल्ह्यात केवळ जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दंतरोगतज्ज्ञ, कान - नाक - घसातज्ज्ञांसह डोळ्यांच्या तज्ज्ञांची यात मोठी भूमिका आहे. आतापर्यंत ७७ रुग्णांना ठणठणीत करून घरी पाठविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
....
कोरोना इतिहास नसलेले ९ रुग्ण
ज्यांना कोरोना झालेला आहे, अशांनाच म्युकरमायकोसिस आजार होत असल्याचा समज होता. परंतु कोरोना नसलेल्या ९ रुग्णांचाही यात समावेश आहे. कोरोना इतिहास असलेले १९४ रुग्ण आहेत. परंतु इतिहास नसतानाही हा आजार झाल्याने कुणीही गाफील न राहण्याचे आवाहन केले जात आहे.
---
जिल्ह्यात आतापर्यंत १९३ रुग्ण आढळले आहेत. पैकी ७७ ठणठणीत झाले असून, ३४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ७० रुग्ण उपचार घेत आहेत.
-डॉ. बाबासाहेब ढाकणे, नोडल ऑफिसर, बीड.
--- एक नजर आकडेवारीवर
एकूण रुग्ण १९३, उपचार सुरू ७०, बरे झालेले ७७, मृत्यू ३४, विनापरवानगी निघून गेलेले १२ ---
पुरूष रुग्ण १२४, महिला रुग्ण ६९ --
वयोगटानुसार रुग्णसंख्या
० ते १८ वर्षे - १ १९ ते ४४ वर्षे - ५१, ४५ ते ६० वर्षे - ६८, ६० वर्षांपुढील - ७३