रस्ता दुभाजकातील झाडे बहरली
बीड : शहरातील रस्ता दुभाजकांच्या मध्ये नगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरणासाठी झाडे लावण्यात आली आहेत. पाऊस व पाणी दिल्यामुळे ती चांगलीच बहरली असून, शहरात ती सुशोभित दिसू लागली आहे. या झाडांना नियमित पालिकेकडून पाणी दिले जात असल्याने वाढ चांगलीच होत आहे. मात्र कटई करण्याचीदेखील गरज आहे. यामुळे ही झाडे आणखी बहरून रस्त्याचे सुशोभीकरण वाढणार आहे.
पंपाला वीज मिळेना
अंबाजोगाई: ग्रामीण भागात सध्या रब्बी हंगाम जोरदार सुरू आहे. सर्वच पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना ८ तास वीज पुरवठा दिला जातो. मात्र, दिला जाणारा वीज पुरवठाही वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
गुरांना उपचार मिळेनात
चौसाळा : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अनेक पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन येतात, मात्र त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने उपचाराविनाच परतावे लागत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी आहे.
वृक्षतोड थांबवा
पाटोदा : तालुक्यातील अनेक भागामधून झाडांची कत्तल बेसुमार केली जात आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असून, सॉ-मिल चालक मात्र मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहेत. मात्र, परवानगी न घेता झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे. यावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.