अंबाजोगाई : पाच जणांनी येथील कापड व्यापाऱ्याचे अपहरण करून २० लाख रुपयांची खंडणीची मागितल्यानंतर एकाने मध्यस्थी करत साडेपाच लाखांची खंडणी देऊन त्या व्यापाऱ्याला सोडवून आणले. चित्रपटाला शोभेला असा हा प्रकार सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी अनोळखी पाच व्यक्तींवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
भानुदास सुधाकर मोरे (रा. तांबसवाडी, परभणी; ह.मु. आनंदनगर, अंबाजोगाई) या व्यापाऱ्याचे योगेश्वरी देवी मंदिराजवळ कापड दुकान आहे. उमेश पोखरकर यांना उधारीवर दिलेल्या साड्यांचा हिशोब करण्यासाठी ते सोमवारी रात्री १० वाजता दुचाकीवरून घराकडे निघाले होते. मोंढा रोडवरील जुन्या पेट्रोल पंपाजवळ मागून पाच अनोळखी व्यक्ती स्विफ्ट कारमधून (एमएच- १२ क्यूटी- ३३९३) आले आणि त्यांनी मोरे यांची दुचाकी अडवली. बळजबरीने भानुदास मोरे यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून केज, मांजरसुंबा मार्गे चौसाळा रोडला १२ किमीपर्यंत नेले. तिथे त्यांना बेदम मारहाण करत २० लाख रुपयांची खंडणी मागितली. मॅनेजरला फोन करून पैसे मागवून घेण्यास सांगितले. मॅनेजर नारायण शिंदे याने मोरे आणि उमेश पोखरकर यांचे बोलणे करून दिले. पोखरकर यांनी मध्यस्थी करून अपहरणकर्त्यांशी बोलणे केले आणि साडेपाच लाख रुपयांत मोरे यांना सोडून देण्याचे ठरले. त्यानंतर पोखरकर हे रक्कम घेऊन मंगळवारी पहाटे ३.४५ वाजता मांजरसुंभा परिसरातील हॉटेलवर पोहोचले आणि त्या अपहरणकर्त्यांना रक्कम देऊन मोरे यांची सुटका केली. यावेळी पोलिसांत तक्रार केल्यास कुटुंबासह तुला खल्लास करूत, अशी धमकी देऊ ते अपहरणकर्ते निघून गेले. मोरे यांनी पोखरकर यांच्या सोबत अंबाजोगाई गाठली. त्यानंतर शनिवारी त्यांनी शहर पोलिसांत याबद्दल तक्रार नोंदविली. तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.