बीड : कोरोना लस देण्याची तारीख १६ जानेवारी अंतिम करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या असून, ९ ठिकाणांहून ही लस दिली जाणार आहे. एका ठिकाणी दररोज १०० लोकांना लस देण्याचे नियाेजन असून, जिल्हाभरात रोज ९०० आरोग्यकर्मींना लस दिली जाणार आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे.
कोरोना काळात फ्रंटलाइन काम करणाऱ्या आरोग्यकर्मींना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. याबाबत शासनस्तरावरून विविध नियोजन करण्यात आले होते. याची तारीख अंतिम झाली नव्हती. कधी लस येणार, याची प्रतीक्षा सर्वांनाच होती. ८ जानेवारी रोजी ड्राय रन घेण्यात आला. हा यशस्वी झाल्यानंतर शनिवारी रात्री कोरोना लस देण्याची तारीख १६ जानेवारी अंतिम करण्यात आली. याबाबत आरोग्य विभागाला सूचनाही करण्यात आल्या असून, ते तयारीलाही लागले आहेत. जिल्ह्यात नऊ ठिकाणी नियोजन केले असून, एका ठिकाणी दररोज ९०० लोकांना लस दिली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम यांनी याबाबत नियोजन करण्यासही सुरुवात केल्याचे सांगण्यात आले. राज्याच्या लसीकरण मोहिमेचे सहसंचालक डाॅ. डी.एन. पाटील यांच्याकडूनही व्हीसीद्वारे आढावा घेतला जात आहे.
या ठिकाणी दिली जाणार लस
जिल्हा रुग्णालय बीड, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई, परळी, गेवराई व केज उपजिल्हा रुग्णालय, धारूर, माजलगाव, पाटोदा व आष्टी ग्रामीण रुग्णालयात लस दिली जाणार आहे. एका बुथवर पाच कर्मचारी असतील.
कोट
१६ जानेवारी रोजी लस दिली जाणार आहे. ९ ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. एका ठिकाणी रोज १०० आरोग्यकर्मींना लस दिली जाईल. एका बुथवर पाच कर्मचारी असतील. याबाबत समन्वय समितीची बैठक बोलावली आहे.
डॉ. संजय कदम
नोडल ऑफिसर, लसीकरण मोहीम