बीड : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाकडून सोमवारपासून जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व ठाण्याची वार्षिक तपासणी होणार आहे. यासाठी परिक्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयासह इतर ठाण्यांमध्ये स्वच्छता व रंगरंगोटीची कामे करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस दलाची दरवर्षी औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून वार्षिक तपासणी केली जाते. विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या सूचनेनुसार एक पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल होत आहे. तपासणीच्या पहिल्या दिवशी पथकाकडून पोलीस अधीक्षक कार्यालयाची पाहणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून पोलीस दलाची तयारी सुरू आहे. अधीक्षक कार्यालयात रंगरंगोटीसह अभिलेखे अद्ययावत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. सोमवारपासून तपासणीला सुरुवात होणार असल्याने रविवारीही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात तळ ठोकून होते. तपासणीसाठी आवश्यक असलेले अभिलेखे अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पथकाच्या तपासणीदरम्यान कोणतीही कमतरता भासणार नाही यासाठी पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि भारत राऊत यांच्याकडून सर्व गोष्टी पडताळून घेतल्या जात आहेत.
महानिरीक्षकांच्या पथकाकडून आजपासून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST