फोटो क्रमांक : ०६ बीइडीपी -राधा आसाराम रेड्डे (मयत)
औरंगपूर शिवारातील घटना : दोन वर्षांपूर्वी झाला होता आजारपणामुळे मुलाचा मृत्यू
बीड : दोन वर्षांपूर्वी आजारपणामुळे ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. मात्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यामुळे पुन्हा मुलगा होणार नाही, याच रागातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील औरंगपूर शिवारात घडली.
राधा महादेव रेड्डे असे मारहाणीत ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती आसाराम रेड्डे याला बीड ग्रामीण पोलिसांनी ६ फेब्रुवारी रोजी अटक केली. दहा वर्षांपूर्वी पैठण तालुक्यातील चित्तेगाव येथील राधा आसाराम रेड्डे (वय ३१) यांचा विवाह गेवराई तालुक्यातील इरगाव येथील महादेव आसाराम रेड्डे (३६) सोबत झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य झाले. मात्र, आजारपणामुळे ८ वर्षांच्या मुलाचा २ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे आपल्या वंशाला दिवा नाही, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यामुळे आता तुला मुलगा होणार नाही. आता दुसरी बायको करावी लागेल असा तगादा महादेवने पत्नी राधाकडे लावला. यावर दुसरे लग्न करण्यापेक्षा मुलगा होण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया पलटून घेऊ असे तिने सुचवले. यासाठी बीडच्या एका खासगी दवाखान्यात डॉक्टरांनी तपासण्या करून ३० हजार रुपये खर्च सांगितला. त्यामुळे महादेवने एवढे पैसे काेठून आणायचे आणि तरीही मुलगा झाला नाही, तर असे म्हणत रुग्णालयातच राधाला शिवीगाळ करून भांडण केले.
घरी आल्यानंतर ४ फेब्रुवारी रात्री ते ५ फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास महादेवने पत्नी राधा हिचे हातपाय बांधून लाकडी दांड्याने मारहाण केली व घरातून निघून गेला. त्यानंतर सकाळी ९ वाजता जखमी राधाने शेजारच्या महिलेला हाक मारून दवाखान्यात नेण्याची विनंती केली. निपाणी जवळका येथील दवाखान्यात घेऊन जातानाच राधाचा मृत्यू झाला. ही माहिती कळताच तिच्या माहेरच्या लोकांनी गेवराई पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रमुख संतोष साबळे, एपीआय योगेश उबाळे, राजपूत यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी ६ फेब्रुवारी रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी महादेव रेड्डे याच्या विरोधात मयत राधाचा भाऊ सुनील राधाकिसन बांगडे (रा. चित्तेगाव, ता. पैठण) याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि. योगेश उबाळे करत आहेत. न्यायालयात हजर केले असता, ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी सालगडी म्हणून करत होता काम
आरोपी महादेव आसाराम रेड्डे हा सालगडी म्हणून औरंगपूर येथील एका शेतकऱ्याकडे काम करत होता. त्याच शेतात त्याची राहण्याची व्यवस्था शेतमालकाने केली होती. जवळ शेजारी कोणी नसल्यामुळे मारहाण झाल्यानंतर देखील सोडवण्यासाठी कोणी येणे शक्य नव्हते. आरोपीला ४ वर्षांची एक मुलगीदेखील आहे.