बीड : ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक आयोगाने पूर्वीच्या ४८ निवडणूक चिन्हात आणखी १४२ चिन्हांची भर घातली आहे. असे असले तरी उमेदवारांची पसंती ही नेहमीच्या चर्चेतील चिन्हांनाच अधिक असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.
निवडणूक आयोगाने दैनंदिन जीवनातील वापरातील आणि सुपरिचित असलेल्या वस्तू, फळ, भाज्यांना निवडणूक चिन्हे म्हणून मान्यता दिली असून पहिल्या ४८ चिन्हांसह आणखी भर पडलेल्या १४२ चिन्हांचा पर्याय उमेदवारांसमोर ठेवला होता. यावेळेसच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने नोंदणीकृत २६० निवडणूक चिन्हांपैकी राजकीय पक्षांची १६ चिन्हे राखीव ठेवली आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना या १९० चिन्हांचा पर्याय ठेवला होता.
बीड जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे १११ ग्रामपंचायतींसाठी १ हजार ८४८ उमेदवार रिंगणात उतरले असून, यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ४ जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. १८ तारखेला निकाल लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यंदा मुख्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील उडी घेतली आहे.
वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार
पूर्वी पॅनल तयार करून एकाच चिन्हावर ग्रामपंचायत निवडणूक लढवली जात असे. आताही एकापेक्षा अनेक पॅनल यावेळेसच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पॅनल असले तरी एका ग्रामपंचायतीतील उमेदवारांना वेगवेगळे चिन्ह घ्यावे लागतील.
अशी आहेत चिन्ह
निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी १९० चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कपाट, सफरचंद, ऑटोरिक्षा, फुगा, बॅट, पुस्तक, बादली, केक, कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट,
कंगवा, हिरा, कप-बशी, फुटबॉल, चश्मा, हॉकी, इस्त्री, जग, किटली, चावी, लॅपटॉप, लुडो, कढाई, पेन ड्राईव्ह, कैची, अननस, छत्री, पांगुळगाडा, टोपली,
फलंदाज, विजेचा खांब, डिश अँटेना, ऊस, बासुरी, मिक्सर, पंचिंग मशीन, फ्रीज, शिवण, यंत्र, स्कूटर, सोफा, बिगुल, तुतारी, टाईपराईटर, अक्रोड, कलिंगड, पाण्याची टाकी, विहीर, सिटी, चिमटा, नांगर.
आधुनिक उपकरणासह भाजी, फळे, लाकडे साहित्याच्या नवीन चिन्हांची पडली भर
२०१९ पर्यंत निवडणूक चिन्हांची संख्या ४८ होती. त्यावेळी पक्षांची संख्या आणि उमेदवारांची संख्याही मर्यादित होती. जसजशी लोकशाही प्रगल्भ होत गेली त्या प्रमाणात पक्ष आणि उमेदवार वाढू लागले.
आता या ४८ निवडणूक चिन्हात १४२ चिन्हांची भर पडली आहे. आधुनिक उपकरणासह दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या वस्तू, फळांचा समावेश केला.
भाजी, फळे, फलंदाज, बॅट, लाकडी साहित्यासह अनेक वस्तुंचा यात समावेश आहे.