केज : शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला आग लावून देत, तू माझं काय करायचं तर कर! अशी धमकी दिल्याची घटना १४ मार्च रोजी रात्री दहा ते पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान आनेगाव शिवारात घडली.
या आगीत शेतकऱ्याच्या सोयाबीनचे अंदाजे पंच्याऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी एका जणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील आनेगाव येथील प्रचंड सोपान हंडीबाग या शेतकऱ्याने
त्यांच्या शेतात सोयाबीन काढून त्याचा ढिगारा करून ठेवला होता. त्या सोयाबीनच्या ढिगाऱ्यास रविवारी रात्री ते पहाटेच्या दरम्यान शेजारच्या बाळसाहेब छब्बू हंडीबाग याने आग लावून दिली. मी तुझी सोयाबीन जाळली आहे, तुला काय करायचे तर कर! अशी धमकी देऊन निघून गेल्याचे प्रचंड हंडीबाग या शेतकऱ्याने सोमवारी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी बाळासाहेब हंडीबाग यांच्या विरोधात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक पिंपळे हे करत आहेत.