यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाऊस चांगला झाल्याने जलस्त्रोत तुडूंब भरले. काही ठिकाणच्या नद्यांना अजूनही पाणी आहे. त्यामुळे रबी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, करडई, यांचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला. तर पाण्याची मुबलकता वाढल्याने ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. ही लागवड होऊन आता महिनाभरांचा कालावधी लोटला. सर्वच पिके आता जोमाने बहरू लागली आहेत. मात्र, अशा स्थितीत महावितरणचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.
महावितरणकडून शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा होतो. हा वीजपुरवठा एक आठवडा रात्री तर एक आठवडा दिवसा अशा पद्धतीने वीज दिली जाते. ही वीज देत असतांना वीज पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने विद्युत पंप चालत नाहीत. कमी दाबाने वीज पुरवठा उपलब्ध झाल्यानंतर अनेक विद्युत पंप जळून निकामी होतात.
अगोदरच विजेचा कालावधी कमी असतो. अशा स्थितीत वीज वाहिन्यांमध्ये बिघाड दुरूस्त करण्यासाठी तासन् तास वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे दिवसभरात जो वेळ वीज पुरवठ्यासाठी दिलेला असतो. त्यातील अनेक तास दुरूस्तीतच निघून जातात. परिणामी शेतकºयांना शेतीला पाणी देण्यासाठी कमी कालावधी मिळतो. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध केल्यानंतर अंधारात चाचपडत शेतकºयांना जागरण करत शेतीला पाणी द्यावे लागते. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी व सरपटणारे प्राणी यांचा धोका पत्करून शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यावे लागते. वन्य प्राण्यांमुळे व सरपटणाºया प्राण्यांमुळे अनेक अपघात आजपर्यंत घडलेले आहेत. तरीही महवितरण याची दखल घेत नाही. अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोहित्र अतिदाब आल्यामुळे निकामी होत आहेत. हे नादुरूस्त झालेले रोहित्र दुरूस्तीसाठी शेतकरी स्वखर्चाने तालुक्याच्या ठिकाणी नेतात. पंधरा पंधरा दिवस या रोहित्रांची दुरूस्ती होत नाही. दुरुस्तीअभावी अनेक ठिकाणचे सिंचन रखडते. महावितरणच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील सिंचन धोक्यात आले आहे. या संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता संजय देशपांडे यांच्याकडे विचारणा केली असता शासनाकडे रात्रीचा वीजपुरवठा बदलून दिवसा देण्यात यावा, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच निकामी रोहित्र लवकर दुरूस्त करण्यात येणार असल्याचे देशपांडे लोकमतशी बोलतांना म्हणाले.