बीड : मागील दोन दशकांपासून मुला-मुलींच्या जन्मदरात असमतोल निर्माण झाल्याने जवळपास सर्वच समाजात मुलींची संख्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे व इतर कारणांमुळे उपवर मुला- मुलींच्या लग्नाची चिंता वाढतच आहे. शिक्षण, शहरीकरणाचे आकर्षण आणि भौतिक हव्यासामुळे मुलींच्या अपेक्षा वाढल्याने वरपक्ष हैराण झाल्याचे दिसून आले.
वरपक्षाकडून मुलगी घरचा सांभाळ नीट करील काय? याचा विचार होतानाच मुलाला शोभणारे स्थळ शोधले जाते, तर दुसरीकडे मुलगा डॉक्टर, इंजिनियर, चांगली नोकरी असणारा हवा, त्याचबरोबर शेती, प्राॅपर्टीबाबत अशी अपेक्षा वाढली आहे. सर्वच समाजात मुलींच्या लग्नापेक्षा मुलांच्या लग्नाची चिंता वाढल्याचे वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून काम करणाऱ्या समाजसेवींनी सांगितले, तर ब्राह्मण समाजात पौरोहित्य करणारे वेदशास्त्र फसंपन्न मुलांना डावलले जात असल्याची खंत पद्माकर रत्नपारखी यांनी व्यक्त केली. ८० हजारांपर्यंत मिळकत असणाऱ्या वेदशास्त्र फसंपन्न पुरोहितांना पैसे देऊन त्यांच्या पाया पडतात, आदर ठेवतात, पण त्यांना मुली देण्याचे टाळले जाते, असे ते म्हणाले.
-------
मुलगा डॉक्टर, इंजिनियर आहे का? शेती आहे का?
मुलगा डॉक्टर, इंजिनियर, सरकारी नोकरी असेल तर उत्तम, घर, प्रॉपर्टी हवी. शक्यतो पुणे, औरंगाबाद शहरातील असावा, तेथे फ्लॅट अथवा घर असावे? एवढे असूनही शेती आहे का? अशी विचारणा केली जाते. लग्नानंतर मोठ्या शहरात स्वतंत्र राहण्याच्या हेतूने घरात आई-वडील नको, अशीही अट अप्रत्यक्षपणे असते. भविष्यात प्रसंग ओढवल्यास प्रॉपर्टीत हिस्सा राहावा, या हेतुने शेतीचीही चौकशी केली जाते.
-----------
मुलांच्या बाबतीत जास्त अपेक्षा न करता, अधिक सुखाच्या पाठीमागे न धावता मुलगा निर्व्यसनी, स्वबळावर कमवता, सुसंस्कृत असलातरी स्वीकारायला हवा. अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख सोयी चांगल्या असताना नाहक अपेक्षा वाढत चालल्याने लग्न ही समस्या होऊन बसली आहे. स्थळाबाबत आमचे मंडळ गरजूंना नि:शुल्क सेवा देते.
- पद्माकर रत्नपारखी, पाणिग्रहण वधू-वर सूचक मंडळ, शाखा बीड.
---------
मराठा समाजात ८० टक्के मुला-मुलींचे शिक्षण झालेले आहे. मुलाकडे प्रॉपर्टी असावी, अशी मुलींच्या आई-वडिलांची अपेक्षा आहे; मात्र शेतीकडे कल कमी आहे. दहावी, बारावी शिक्षण झालेल्या मुलींच्या पालकांचीदेखील मुलगा पुणे, मुंबई किंवा मोठ्या शहरातील, नोकरदार असावा, अशी अपेक्षा वाढली आहे. स्थळांबाबत आम्ही कोणतेही शुल्क घेत नाहीत.
- अशोक गायकवाड, नातीगोती, वधू-वर सूचक केंद्र.
--------
मुलीच्या शिक्षणाप्रमाणे पालकांची अपेक्षा आहेच. मुलगा सरकारी किंवा खासगी कंपनीत नोकरदार, किमान ४० ते ५० हजारांपर्यंत पगार असावा, असा कल आहे. मुलगी चांगल्या घरी सुखी राहावी एवढीच माफक अपेक्षा असते.
- कोंडीराम महाराज नाटकर, माजलगाव.
-------
आमच्या समाजात मुलींची संख्या कमी आहे. तालुक्यातील ७० टक्के समाज पुणे व मोठ्या शहरात स्थिरावला आहे. मुलीच्या शिक्षणाप्रमाणे पालकांची अपेक्षा राहणारच आहे. शिक्षित वरस्थळ शोधत आहोत.
- सुरेंद्र जोशी, माजलगाव.