गेवराई : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका पन्नासवर्षीय शेतकऱ्याने आपल्या घरासमोरील चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी पहाटे उघडकीस आली.
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील गावखोर तांडामधील विजय श्रीराम पवार ( वय ५०) यांच्यावर कर्ज होते. नापिकी व अस्मानी संकटामुळे घेतलेले कर्ज फेडणे अशक्य होते. दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असल्याने या कर्जबाजारीपणाला कंटाळून घरातील सर्व व्यक्ती गाढ झोपेत असताना चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन विजय पवार यांनी आत्महत्या केली. पहाटे घरातील सर्व मंडळी जागे झाले असता विजय पवार यांनी गळफास घेतल्याचे पाहिले. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तलवाडा पोलिसांना माहिती दिली. तलवाडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार खाडे, वरकड, तडवी यांनी घटनेचा पंचनामा केला. विजय पवार यांचे आरोग्य केंद्र जातेगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले. मयत विजय पवार यांच्या पश्चात पाच मुली, मुलगा, पत्नी आई, असा परिवार आहे.