बीड : मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांचे आरोग्य बिघडत असल्याचे समोर आले आहे. अभ्यासाच्या नावाखाली तासनतास गेम आणि व्हिडीओ पाहिले जात असल्याने, मुलांना चष्मा लागण्यासह दृष्टीही कमी होत आहे, तसेच मोबाइल काढून घेतल्यास चिडचिडेपणा येत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच घरात बसले. अत्यावश्यक व वैद्यकीय कारण असल्याशिवाय कोणालाही बाहेर निघता आले नाही. या काळात पूर्ण दिवस लहान मुले मोबाइल, कॉम्प्यूटर आणि टीव्हीसमोर असायचे. बाहेर निघण्यास प्रतिबंध असल्याने मैदानी खेळ बंद झाले होते. पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडॉन राहिल्याने मुलांना मोबाइलचे व्यसन लागले. नंतर लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले, तरी शाळा बंदच होत्या. त्यामुळे ऑनलाइन वर्ग घेण्यात आले. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आले. क्लास झाल्यानंतरही गेम खेळणे, व्हिडीओ पाहणे, इंटरनेटचा जास्त वापर करणे, असे प्रकार केले. यामुळे अनेक मुलांना मानेचा, डोळ्याचा त्रास जाणवू लागला, तसेच मोबाइल काढून घेतल्यास त्यांचा चिडचिडेपणाही वाढला. असे अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार व डोळ्यांच्या विभागात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देऊन मोबाइलचा अतिवापर होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
मैदानी खेळ बंदच
लहान मुलांच्या हातात लाडापायी स्मार्ट फोन आले. त्यामुळे जवळपास मुले मोबाइलमध्येच गुंतलेली असतात. त्यामुळे लहानपणी आवडीचे असणारे विटीदांडू, क्रिकेट, कबड्डी, खोखो, सायकल चक्का असे खेळच बंद झाले आहेत. ही लहान मुले मैदानावर जातच नसल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांचे शारीरिक व्यायामही होत नसल्याचे सांगण्यात आले.
काय म्हणतात डोळ्यांचे तज्ज्ञ
मोबाइलच्या अतिवापरामुळे डोळ्यावर ताण येतो, तसेच डोळ्यांना थकवा येणे, कोरडेपणा येणे, चष्मा लागणे असे आजार होत आहेत. त्यामुळे पालकांनी अभ्यासापुरताच मुलांना मोबाइल अथवा कॉम्प्यूटर द्यावा. डोळ्याचे व्यायाम करण्यास सांगावे. मोबाइलवर गेम खेळणे, व्हिडीओ पाहणे कमी करावे. ३ वर्षांपर्यंतच्या मुलांना तर मोबाइलच देऊ नयेत, असे मत जिल्हा रुग्णालयातील डोळ्याचे तज्ज्ञ डाॅ.राधेशाम जाजू यांनी व्यक्त केले.
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...
इंटरनेट, मोबाइलच्या अतिवापरामुळे ‘इंटरनेट ॲडिक्शन’ हा आजार वाढला आहे. वारंवार सोशल मीडियावर राहणे, जास्त वापर करणे, कोणी अडथळा केल्यास चिडचिडेपणा येतो, तसेच त्यांना बैचेन वाटते. हे टाळण्यासाठी मोबाइलचा अतिवापर टाळावा. ठरावीक वेळेपर्यंत मोबाइल हातात घ्यावा. जास्त वेळ मोबाइलमध्येच डोके राहत असल्याने, मान, मणक्याचा त्रासही वाढत आहे. त्यामुळे याकडे पालकांनी लक्ष देऊन लक्षणे जाणवल्यास वेळीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मुजाहेद मोहमंद यांनी व्यक्त केले.