बीड : जिल्हा वकील संघाची १५ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून १३ उमेदवार रिंगणात आहेत. कोरोनामुळे ही निवडणूक सहा महिने लांबली होती. या निवडणुकीत २९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५ जणांनी माघार घेतली. तर एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. त्यामुळे १३ उमेदवारांत लढत होत असल्याची माहिती ॲड. बालाप्रसाद करवा यांनी दिली.
या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. सदानंद राऊत, ॲड. अनिल सुतार व ॲड. देवीदास पायाळ यांनी उमेदवारी दाखल केली आहे. उपाध्यक्षपदासाठी ॲड. संजय जटाळ, ॲड. अंकुश तांबे, सचिवपदासाठी ॲड. नरेंद्र कुलकर्णी, ॲड. एकनाथ काकडे, सहसचिव पदासाठी ॲड. सय्यद जोहबअली अझहरअली, ॲड. सुरेश कांबळे, कोषाध्यक्षपदासाठी ॲड. गणेश तावरे, ॲड. सैरंद्रा डोईफोडे, तर महिला प्रतिनिधी म्हणून ॲड. विशाखा जाधव, ॲड. गीतप्रभा बेहरे (वझे) यांच्यात लढत होत आहे.
वन बार वन वोट
मतदान करण्यास कोणी आक्षेप घेतल्यास मतदान करण्यासाठी ‘वन बार वन वोट’ या नियमाच्या अधीन राहून हमीपत्र लिहू द्यावे लागेल. हमीपत्र लिहून दिल्यानंतर होणाऱ्या परिणामास मतदार स्वत: जबाबदार राहील. विहित नुमन्यातील हमीपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असल्याचे जिल्हा वकील संघाने कळविले आहे.
मतदानानंतर मतमोजणी
जिल्हा वकील संघाच्या या निवडणुकीत ७५९ मतदार आहेत. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. त्यानंतर मोजणी होऊन निकाल जाहीर होईल. मतदान कक्षात शांतता पाळावी. मतदान रांगेत व शिस्तीत करावे. कोविड-१९ नियमांचे पालन करून मतदान करावे.
-ॲड. बालाप्रसाद करवा, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा वकील संघ.