लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात लाखो रुपये वेतन देऊन डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे. परंतु, असे असतानाही सामान्य रुग्णांचे कायम हालच होत असल्याचे दिसत आहे. नियमित एमबीबीएस डॉक्टर हे प्रशिक्षणार्थी अथवा बीएएमएस डॉक्टरांवर जबाबदारी सोपवून दांडीयात्रेवर जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंतर्गत १८ तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत ५२ आरोग्य संस्था आहेत. येथे नियमित व कंत्राटी डॉक्टरांची पदे भरून वेतनावर करोडो रुपये खर्च केले जातात. प्रत्यक्षात सामान्य रुग्णांना वेळेवर सेवाच दिल्या जात नाहीत. याबाबत तक्रारी करूनही आणि वारंवार निदर्शनास आणूनही वरिष्ठांकडून काहीच कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त होत आहे.
उपकेंद्रातही सीएचओ गायब
जिल्ह्यात २९७ आरोग्य उपकेंद्र आहेत. येथे २५३ जागांसाठी सीएचओ भरती करण्यात आली होती. परंतु, २३९ जागेवरच कार्यरत आहेत. असे असले तरी काही ठिकाणी सीएचओंचे काम कौतुकास्पद असून, काही ठिकाणी सीएचओ कायम गायब राहत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हास्तरावरून त्यांची नियमित हजेरी घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु ही हजेरीही संशयास्पद आहे.
ओळखीच्या डॉक्टरांना वरिष्ठांकडून बगल
जिल्हा रुग्णालयात फिजिशियन व इतर महत्त्वाच्या पदावर असलेल्या डॉक्टरांकडून नियमित कर्तव्य बजावले जात नाही. ओपीडी व आयपीडीतील रुग्णांकडे दुर्लक्ष केले जाते. असे असतानाही जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून या डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी पाठबळ दिले जात असल्याचे सांगण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातही दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. अपवादात्मक वगळता सर्वच ठिकाणी हे डॉक्टर आहेत. परंतु, या दोघांमध्ये समन्वय साधून दोघांपैकी एकच डॉक्टर ड्यूटी बजावतात. एकाने ओपीडी आणि दुसऱ्याने भेटी व कार्यक्रम सांगणे आवश्यक असते. परंतु, येथेही दुर्लक्ष होत आहे.
पदभरतीसठी कायम पाठपुरावा सुरूच
जिल्ह्यातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत वरिष्ठांकडे कायम पाठपुरावा केला जात आहे. जेथे जागा रिक्त आहेत, तेथे बंधपत्रित डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येत आहे. नियोजन केले जात आहे.
- डॉ. नरेश कासट
प्रशासन अधिकारी, आरोग्य सेवा