बांधकामांना गती, मजुरांना रोजगार
शिरूर कासार : शहरात घरकुलासह अन्य घरांचे बांधकाम जोरात सुरू आहे. ठिकठिकाणी वाळूचे ढिगारे, विटा, सिमेंट असे साहित्य दिसून येते. बांधकाम मिस्त्रीच्या मदतीला तीन, चार बिगारी मजूर काम करत असल्याने काही अंशी का होईना त्यांना रोजगार मिळत असल्याचे दिसू येत आहे.
लाॅकडाऊनमुळे भाजी विक्रेत्यांची भटकंती
शिरूर कासार : कोरोनामुळे आता बाजार, गुजरी बंद असल्याने विक्रेत्यांना भटकंती करूनच भाजी विकावी लागत आहे. यंदा शेतात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला वांगी, मेथी, कोथिंबीर, पालक, टोमॅटो आदी भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. मात्र बाजारच बंद असल्याने मिळेल त्या भावात भाजी विक्री करावी लागत आहे. हा माल नाशवंत असल्याने काढल्याबरोबर तो विकणे जरुरी असते अन्यथा शिळा माल विकला जात नाही. मग तो जनावरांना खाऊ घालावा लागतो.
मोकाट जनावरांची वर्दळ कायम
शिरूर कासार : सातत्याने मोकाट जनावरांचा उपद्रव सुरू असून यावर नियंत्रण मिळणे कामी अद्यापही यश आले नाही, नगरपंचायतडून वारंवार या गुरांसाठी आवाहन केले जाते. मात्र मालकीच नाकारली जात असल्याचेही दिसून येते. या जनावरांना आळा घालण्यासाठी नगरपंचायत ताबा देणार असली तरी त्यासाठी पुढे कोणी येत नाही. गल्लोगल्ली ही जनावरे घास तुकड्यासाठी भटकंती करत असतात तर कधी कधी त्यांचे पोटात प्लास्टिक जात असल्याने त्यांना धोका संभवतो, कायमचा तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
आगीबाबत दक्षता घेण्याचे आवाहन
शिरूर कासार : सध्या उष्णता भडकत असून अशा उन्हाळ्यात डोंगराला आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. डोंगरात वणवा पेटला आणि अशातच वारा सुटला तर हा वणवा अतिवेगाने डोंगर व्यापतो. लागलेल्या आगीत हजारो जीवजंतू आणि छोटी, मोठी झाडेझुडपे आगीच्या भक्ष्यस्थानी जातात. वन विभाग त्यांच्या मालकी हक्कातील डोंगर दरी सांभाळत असले तरी खासगी किंवा गायरान माळरान मात्र बेभरोसे असते. वाळलेले गवत कागदाप्रमाणे पेट घेते आणि क्षणात डोंगर व्यापते. आग लागणार नाही, याची दक्षता सर्वांनीच घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.