बीड : पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज भडकत असतानाही गरज म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. कामाचा व्याप, कामाचे ठिकाण ते घर, इतर कामांसाठी शहरा विस्तारामुळे वाहनांचा वापर वाढला आहे. त्यात मागील वर्षभरापासून कोराेनाच्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या सुरक्षेसाठी वाहने खरेदीचा ओघही वाढला. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झाली? आहे. यातच मागील तीन महिन्यांत पेट्रोल-डिझेलचे दर हळूहळू वाढतच राहिले. इंधनदरवाढीचे भडका उडाल्याची ओरड करतानाही वपर मात्र बेमालूमपणे सुरूच आहे. किरकोळ बाजारात किंवा मंडईमध्ये भाजी खरेदी करताना घासाघीस करून ताेलून-मापून घेणारा ग्राहक मात्र पेट्रोल पंपावर वाहन घेऊन गेल्यानंतर इंधन भरताना मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात दरानुसार प्रमाणात इंधन वाहनात भरले की नाही, याचेही भान तो विसरत असल्याचे दिसते. शहरातील पेट्रोल पंपांवर फेरफटका मारल्यानंतर काही ठिकाणी डिलेव्हरी बॉयला आजचा भाव काय?अशी विचारणा करतात. मग खिशातून काढलेल्या रकमेचे पेट्रोल भरायला सांगतात. परंतु डिलेव्हरी किती झाली? याची पाहणी ग्राहक करीत नसल्याचे दिसते. त्यामुळे वैधमापन विभागाकडे तक्रारींचे प्रमाण कमीच असल्याचे दिसून आले आहे. वैधमापन विभाग त्यांना ठरवून दिलेल्या चौकटीत निरीक्षण, तपासणी करण्याचे सोपस्कार पार पाडताना दिसत आहेत. मात्र ग्राहक जागृत नसल्याचे किंवा बेफिकीर असल्याचे पाहायला मिळाले.
----------
बीड येथील वैधमापन विभागाकडे वर्षभरात इंधन कमी मिळाल्याने माप तसेच जागेचे कागदपत्रांबाबत केवळ एक तक्रार आली. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी केली. मात्र पुढे काय हे समजू शकले नाही. याशिवाय कोणतीही कारवाई या विभागाकडून झालेली नाही.
---
इंधन पुरवठा व्यवस्थितरित्या होतो की नाही, यासाठी वैधमापन विभागाच्यावतीने निरीक्षक ‘डिलेव्हरी चेक’ करतात. पाच लिटरचे माप घेऊन दिलेल्या इंधनाची तपासणी करण्यात येते. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत चार डिलेव्हरी चेक झाल्याचे सांगण्यात आले.
-------
पेट्रोल पंपाचे होते व्हेरिफिकेशन
पेट्रोल पंपावर इंधन कंपनीचे विक्री अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, वैधमापन निरीक्षकांकडून यंत्रणा, तांत्रिक बाजू तसेच डिलेव्हरीची तपासणी करण्यात येते. तसेच प्रत्येक पेट्रोल पंपावर किमान तीन ते चारवेळा अचानक साधारण निरीक्षण केले जाते. हे काम शंभर टक्के पूर्ण होते. - अ. शि. गिरनारे, उपनियंत्रक, वैधमापन विभाग, बीड.
-----
बीड जिल्ह्यातील पेट्रोल पंप १६५
दररोज विक्री होणारे डिझेल २२४००० लिटर
दररोज विक्री होणारे पेट्रोल १७०००० लिटर
---------
बीड शहरातील पंप १२
दररोज विक्री होणारे पेट्रोल १८००० लिटर
दररोज विक्री होणारे डिझेल २१००० लिटर
--------
जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरील एकूण आऊटलेट नोजल ९९४
--------
कंपन्यांकडूनही ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण
इंधन कंपन्यांकडे ग्राहक विविध तक्रारी करतात. त्यांच्या तक्रारींचे ॲटोमेशन, व्हिडीओ तसेच प्रात्यक्षिकासह समाधान केले जाते. अनेक वाहनधारक त्यांच्या वाहनाच्या इंधन टाकीच्या सेल्फ कपॅसिटीबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत त्यांच्या तक्रारींचे निवारण केले जाते. - प्रसाद सावजी, एरिया सेल्स मॅनेजर, हिंदुस्तान पेट्रोलियम.
-----
इंधन भरताना गतीवर द्या लक्ष
पेट्रोल पंपांवर प्रोटेक्ट पल्सर यंत्रे असल्याने फसगत होण्याचे धोके तसे कमीच आहेत. काही ठिकाणी डिलेव्हरी बॉय इंधन टाकीत टाकताना गती बदलतात, मात्र यातून २ किंवा ३ मिलिचा फरक पडतो, त्याकडे सहज दुर्लक्ष होते.
--------