सीएसकडून आढावा : जिल्ह्यातील इतर शासकीय आरोग्य संस्थांचीही मागविली माहिती
बीड : जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्ष काकू नाना हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केले आहे. याची रविवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी तपासणी करून आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील इतर शासकीय आरोग्य संस्थांचीही माहिती मागविण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांबाबत अद्यापही ठोस पावले उचलली नसल्याचे दिसते. भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटनेने पोळलेले असताना बीडमध्ये आरोग्य विभाग ताक फुंकत कामाला लागले आहे.
भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. बीडमध्येही आरोग्य विभाग कामाला लागला आहे. रविवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गित्ते यांनी नवजात शिशु कक्षाची पाहणी केली. येथील वीज, पाणी, आपत्कालीन स्थिती आदींचा आढावा घेतला. येथील प्रमुख डॉ. इलियास खान यांनी कक्षाच्या सुरक्षिततेची माहिती दिली. सोबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, मेट्रन संगीता दिंडकर होते. आता याच घटनेच्या अनुषंगाने सोमवारी सकाळी १० वाजता या कक्षात मॉकड्रील होणार आहे. आपत्कालीन स्थिती ओढावली तर काय करता येते, याची तपासणी केली जाणार आहे.
या मुद्यांची मागविली माहिती
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी फायर ऑडिट झाले आहे का, तेथे आपत्कालीन स्थिती ओढावल्यास स्प्रींकलर, स्मोक डिटेक्टर्स, फायर ॲक्स्टींगलिशर, फायर प्रुफ वॉल्व्ह या गोष्टी आहेत का, याची माहिती मागविण्यात आली आहे. तसेच एसएनसीयू, एनआयसीयू, एसबीसीयू या ठिकाणी कार्यरत डॉक्टर, परिचारिका, ड्युटी शेड्यूल, ऑक्सिजन प्लांट, विजेचा पुरवठा याचीही सर्व माहिती संचालकांना पाठविली जाणार आहे.
पाच वर्षांपासून ऑडिटच नाही
साधारण २०१५ साली जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी मॉकड्रीलही केले होते. परंतु त्यानंतर असे ऑडिटच झाले नसल्याचे समोर आले आहे. गतवर्षी आगीची घटना घडल्यानंतरही यावर काहीच उपाययोजना केल्या नाहीत.
अग्निरोधक यंत्र मुदतबाह्य
जिल्हा रुग्णालयासह इतर शासकीय व खासगी रुग्णालयांत भिंतीला लटकवलेले अग्निरोधक यंत्राची मुदत संपलेली आहे. याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसते. जिल्हा रुग्णालयातील हे यंत्र मुदतबाह्य झाल्याचे डॉ.गित्ते यांनीही मान्य केले आहे.
कोणते यंत्र कोठे असते
आपत्कालीन व्यवस्थेत तत्काळ आग आटोक्यात आणता यावी यासाठी अग्निरोधक यंत्र असतात. सहा किलोचे यंत्र रुग्णालयात असते. ८ किलोचे पेट्रोलपंप तर ४ किलोचे दुकाने व इतर ठिकाणी वापरू शकतो. एका वर्षात त्याची मुदत संपते. पुन्हा भरण्यासाठी केळव ६०० ते ८०० रुपये खर्च येतो. परंतु तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात.
खासगी रुग्णालये मोकाटच
खासगी रुग्णालयातील शिशुगृहात आपत्कालीन व्यवस्था दिसून येत नाही. त्यांच्याबाबतीत अद्याप जिल्हास्तरावरून काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यांना सूचना करून माहिती मागिवीली जाईल, असे डॉ. गित्ते म्हणाले. असे असले तरी अद्याप त्यांच्याकडे जिल्ह्यात किती खासगी रूग्णालयांमध्ये एसएनसीयू आहेत, याचीच माहिती नसल्याचेही समोर आले आहे.
कोट
शासकीय एसएनसीयू विभागाची पाहणी केली आहे. इतर ठिकाणचीही माहिती घेतली जाणार आहे. खासगी रूग्णालयांना सूचना करून त्यांच्याकडे नियमाप्रमाणे आहे का, याची माहिती मागविली जाईल. खासगीएसएनसीयूबाबत अद्याप माहिती नाही. उद्यापर्यंत येईल.
डॉ.सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड