शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन ठरते ती काळी आई. कितीही रुसली तरी तिची कूस शेतकरी बियाण्यांनी भरतो. त्यात कष्ट उपसतो आणि थोडे-थोडके जे काही असेल, ते घरी आणून त्यावर गुजराण करतो. स्वातंत्र्यानंतर देशात यांत्रिक युगाची चाके गतीने फिरायला लागली. परिणामी भूमिहिनांनी प्रथम शहराची वाट धरली. त्यानंतर ज्याच्याकडे शेतीची मुबलकता, ते शहरात शिक्षण, अन्य व्यवसायासाठी स्थिरावले. मात्र, ज्यांचा मातीशी लळा, ते मात्र गावातच राहिले स्थितप्रज्ञासारखे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पाऊस त्यांना वाकुल्या दाखवित आहे. पीक माना टाकत आहे. पुढील पेरणी त्यांना दुसऱ्यांकडून उधार-पाधार घेऊनच करावी लागणार आहे. मात्र, तरीही ते जमिनीवर घट्टपणे पाय रोवून आहेत आणि निधड्या छातीने सांगत आहेत - आम्ही अजून जिवंत आहोत, जगत आहोत.
- धीरेंद्र चाकोलकर, अमरावती
--------------------