बड़नेरा : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण केव्हा करणार, असा प्रश्न या मार्गावरील वाढत्या वाहनांच्या वर्दळीमुळे व सततच्या अपघाताने समोर आला आहे. शासन, प्रशासनाने याची प्राधान्याने दखल घेणे गरजेचे झाले आहे.
गांधी विद्यालयासमोरून जाणाऱ्या महामार्गावर तब्बल २५ वर्षांपूर्वी उड्डाणपूल उभारण्यात आला तेव्हा व आताच्या वर्दळीत मोठी तफावत झाली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या काही पटीने वाढली आहे. वाहनेदेखील प्रचंड वाढलीत. बडनेऱ्यात जंक्शन रेल्वे स्थानक आहे. दररोज मोठ्या संख्येत रेल्वे गाड्या येथून धावतात. प्रवाशांना हाच अरुंद उड्डाणपूल ओलांडून रेल्वे स्थानकावर यावे लागत आहे. त्याचप्रमाणे बडनेरा शहरातून नियमित अमरावतीकडे जाणाऱ्या वाहनांचीदेखील मोठी रेलचेल असते. याच उड्डाणपुलावरून एसटी महामंडळाच्या बसेस, ऑटो मिनीडोअर, सध्या बंद असलेल्या शहर बसेस यांचीदेखील वाहतूक असते. वाढत्या वाहतुकीच्या वर्दळीत हा उड्डाणपूल अरुंद झाला आहे. अरुंद उड्डाणपुलामुळे बरेच अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना येथून जीव मुठीत घेऊनच आपली वाहने चालवावी लागत आहे. वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असणाऱ्या या पुलाचे रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
बॉक्स:
भुयारी मार्गाची मागणी
शाळकरी विद्यार्थी, शेतकरी काही खेड्यांवरील लोक परिसरवासीयांना दररोज याच वर्दळीच्या उड्डाणपूलाला ओलांडून ये-जा करावी लागत असून, या सर्वांच्या काळजीपोटी गांधी विद्यालयापासून ते पाच बंगल्याकडे भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणी नागरिक कृती समितीचे अरुण साकोरे, संजय यादव, अनिल बनसोड, अजय यादव, बंटी वाहने, संतोष भटकर, सुनील शेरेवार, रंजना साकोरे, प्रतिभा नकाते आदींनी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडे केली आहे.
बॉक्स:
पुलाची धोकादायक अवस्था
उड्डाणपुलाच्या मध्यभागी व उतारांवर खड्डे पडले आहेत. फूटपाथ धोक्याचे झाले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने असणारे संरक्षण कठण्यांची मोड़तोड झाली आहे. एकूणच या उड्डाणपुलाची अवस्था धोकादायक झाली आहे.