फोटो पी ११ अंजनगाव बारी फोल्डर
अंजनगाव बारी : ''क'' दर्जा प्राप्त झालेल्या अंजनगाव बारी येथील श्री समर्थ रामगीर महाराजांच्या समाधी मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यास अद्यापही सुरुवात झालेली नाही. मंदिराचे बांधकाम ३५० वर्षे जुने असताना, आणि आता ''क'' दर्जा मिळालेला असताना ''विकास निधी गेला कुठे'', असा सवाल ग्रामस्थ करू लागले आहेत.
या मंदिराचा ४५० वर्षांचा इतिहास आहे. समर्थ रामगीर महाराजांच्या चौथ्या पिढीत या मंदिराचे मठाधिपती लक्ष्मणगीर महाराजांच्या काळात मंदिराच्या प्रमुख सभामंडपाचे बांधकाम १२ हजार एवढ्या लोकवर्गणीतून करण्यात आले. या सभामंडपाचे बांधकाम विटा व दगडामध्ये झाले असून, आता ते बांधकाम धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत येथे भक्त निवासाचे बांधकाम करण्यात आले. मात्र, या मंदिराच्या प्रमुख समाधी मंदिर जीर्णोद्धाराचा प्रस्ताव प्रलंबितच राहिला. या मंदिरात कार्यकारी मंडळ नाही. केवळ एका मठाधिपतींवर कारभार चालतो. त्यामुळे पुढाकार कोण घेणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे. स्थानिक ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनीच पाठपुरावा करून या मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी निधी आणावा, तरच बाका प्रसंग टाळता येणे शक्य असल्याचे ग्रामस्थ व मठाधिपतींचे म्हणणे आहे.