महापालिकेचे दुर्लक्ष : कारवाईस विलंब का ?अमरावती : महापालिकेच्या प्रवेश व्दारालगत एका इमारतीत चढण्यासाठी अनधिकृत जीना बांधलेला आहे. त्यामुळे नागरिकांचा फुटपाथचा मार्ग बंद झाला आहे. सदर जीना काढण्याची महापालिका केव्हा कारवाई करणार, असा प्रश्न अंबानगरीतील नागरिकांना पडला आहे. याकडे महापालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, होत असून कारवाईला विलंब का, असा प्रश्न चर्चेला जात आहे. राजकमल ते बडनेरा मार्ग हा जुना राज्य महामार्ग आहे. हा रस्ता सा.बां. विभागाच्या अख्त्यारित येत असून त्या इमारतीत चढण्यासाठी फुटपाथपासून ईमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत लोखंडी जीना टाकण्यात आला आहे. जीन्याखालूनच फुटपाथ असल्यामुळे तो रस्ता बंद झाला आहे. महापालिका सर्वांना शिस्तीत राहण्याचे धडे देते. कुठेही अनधिकृत बांधकाम असेल तर ते पाडण्यापर्यंतची कारवाई करते. मात्र महापालिकेच्या इमारतीतच असा अनधिकृत जीना बांधल्यामुळे तो कोण काढणार, असा सवाल जनता विचारत आहेत. 'लोकमत'ने हा प्रश्न यापूर्वीही लोकदरबारात मांडला होता. लवकरच पाहणी करून हा जीना जर अनधिकृत असेल तर हटविण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. पण याला महिना उलटून गेल्यावरही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. इमारतीचे बांधकाम जेव्हा करण्यात आले. तेव्हा येथे वरच्या मजल्यावर चढण्यासाठी समोरीला बाजूस अधिकृत जीना तयार करण्यात आला नाही. यामुळे येथील व्यावसायिकांनी फुटपाथपासूनचा हा मार्ग बंद करून ग्राहकांना वरच्या मजल्यावर चढता यावे याकरिता दोन जीने टाकले. यामुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहेत. सदर इमारत बीओटी तत्त्वावर बांधून त्याचे गाळे ईतर व्यवसायिकांना महापालिकेने भाडे तत्त्वावर दिल्याचे समजते.
केव्हा काढणार अनधिकृत जीना ?
By admin | Updated: September 14, 2016 00:19 IST