सचिन सुंदरकर - ब्राह्मणवाडा थडीचांदूरबाजार तालुक्यात ब्राह्मणवाडा (थडी) येथील महाप्रलयासाठी पूर्णा प्रकल्पाचे अधिकारी दोषी आहेत. गावकरी बेसावध असताना त्यांनी तीन मिटर पर्यंत धरणाचे दरवाजे उघड्याने गावात प्रचंड वित्तहाणी झाली. याप्रकरणी संबंधितांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ब्राह्मणवाडा थडीचे सरपंच नंदू वासनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.धरणाचे दरवाजे तीन मिटरने उघड्याची पूर्वसूचना ब्राह्मणवाडा (थडी) च्या ग्रामस्थांना नव्हती. सकाळी ८ वाजेपर्यंत नदीला फारसे पाणी नव्हते. पूर्णा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अर्धा इंच पाणी सोडतो, असे सांगितले. परंतु अचानक सकाळी ११ वाजता नऊही दरवाजे १० फुटापर्यंत उघडण्यात आल्याने बेसावध शेकडो नागरिकांच्या घरांत पाणी शिरले व वित्तहानी झाली. याला प्रशासन दोषी असल्याचा आरोप सरपंच वासनकर यांनी केला. पुरग्रस्ताने लावला होता गळफासगावात आलेल्या प्रलयकारी पुराने नागरिकांचे संसार उघड्यावर आले. घरातील सर्वकाही वाहून गेल्याचा धक्का बसलेल्या गोविंद नागोराव कुरवाळे या अठरा वर्षीय युवकाने सोमवारी सायंकाळी गळफास लाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांच्या समयसूचकतेमुळे त्याचे प्राण वाचले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेगाळ काढण्याचे काम सुरुमहाप्रलयानंतर गावात जेसीबीने गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे. पुरामुळे आरोग्य केंद्रानजिक असणारी संरक्षक भिंत तुटल्याने तेथील मलबा काढण्याचेही काम जोरात सुरु आहेत. मशिदीसमोरही गाळ साफ करण्यात येत आहे.प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळब्राह्मणवाडा थडी हे मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे. या गावात सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने राहतात. परंतु रविवारी केवळ प्रशासनाच्या लापरवाहीमुळे एका युवकाचा बळी गेला. शेकडो नागरिकांचे संसार उघड्यावर आले. याला प्रशासनाचे कामचूकार अधिकारी दोेषी आहेत. अशा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ग्रामपंचायततर्फे मागणी केली जाणार असल्याचे सरपंचांनी सांगितले.ब्राह्मणवाड्यासाठी रविवार ठरला काळा दिवस ब्राह्मणवाडा थडी येथील पुर्णा नदीने रौद्ररुप धारण केले होते. पुराचे पाणी गंगामाय मंदिरापासून तर ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत शिरले. नागरिक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत होते. कुणी झाडावर तर कुणी गच्चीवर होते. यातच एका निष्पाप युवकाचा बळी गेला. ही मनुष्यहानी न भरुन निघणारी आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तीन मिटर पर्यंत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहीती आधी ग्रामपंचायतच्या जबाबदार अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांना दिली असती तर नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असती. परंतु ग्रामपंचायतला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडणार असल्याची माहीती नव्हती. गावात पुराचा तांडव सुरु होता. नागरिक जीव वाचविण्यासाठी पळत होते. घरातील धान्य पुरात वाहून गेले. नागरिकांचे कपडेलत्ते वाहून गेले. काही क्षणातच भरलेले घर कोसळून प्रचंड नुकसान झाले. ब्राह्मणवाडा वासीयांसाठी रविवारचा दिवस काळा दिवस ठरला. गावात महाप्रलय आल्याची माहिती जिल्हाप्रशासनाला माहिती पडली होती. परंतु बचाव पथक येथे सर्वकाही झाल्यावर पोहचले. मदतीसाठी धावले ते गावकरीच. एरव्ही आपसात वैमनस्य असणारे नागरीक सुध्दा यावेळी एकत्र आले होते. त्यांच्या सोबतिला मुस्लिम बांधव सुध्दा होते. कुणी दोर झाडाला बांधून तर कुणी मिळेल ती वस्तू घेऊन पुरातील नागरिकांना बाहेर काढले.
बेसावध क्षणी सोडले पूर्णा प्रकल्पाचे पाणी
By admin | Updated: July 29, 2014 23:32 IST