अमरावती : विदर्भ विकास योजनेत विदर्भात झालेल्या सुमारे ३० कोटी रूपयांच्या जलसंधारणाच्या कामांच्या चौकशीचे आदेश कृषी आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. यामध्ये अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यांतील जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे. ही चौकशी करण्यासाठी हिंगोली येथील उपविभागीय कृषी अधिकारी उत्तम शिवणगावकर यांच्या नेतृत्वातील समिती या दोन जिल्ह्यांत दाखल झाली आहे. त्यांनी चौकशीची कारवाई सुरू केल्याची माहिती आहे. विदर्भात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणी प्रश्नामुळे या भागासाठी विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत जलसंधारणाची कामे कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आली आहेत. या कामांमध्ये सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, सलग समजलचर, शेततळे आदी कामांचा समावेश आहे. या योजनेतून अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात सुमारे ३० कोटी रूपयांची कामे करण्यात आली आहेत. या कामांची देणे अद्यापही बाकी आहे. सदर कामे खरोखरच करण्यात आली आहेत किंवा नाही, अंदाजपत्रकानुसार कामे झाली आहेत काय? याची पाच टक्के तपासणी करण्याच्या सूचना कृषी आयुक्त कार्यालयाने दिल्या. हिंगोली येथील उपविभागीय कृषी अधिकारी उत्तम शिवणगावकर यांच्या पथकाला अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांच्या तपासणीची जबाबदारी दिली आहे. चौकशीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. हिंगोली येथील तपासणी समिती जिल्ह्यात दाखल झाली आहे. ही समिती आठवडाभर तपासणी करून अंतिम अहवाल कृषी आयुक्तांना सादर करणार आहे. त्यानंतरच या कामांचे देयके अदा केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
जलसंधारण कामांची चौकशी
By admin | Updated: August 7, 2014 23:42 IST