अमरावती : शासनाने १ मार्चपासून ज्येष्ठांसह सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. मात्र, तूर्त हे लसीकरण शहरी भागात असल्याने कोरोना लसीकरणाची माेहीम ग्रामीण भागात केव्हा राबविणार, असा सवाल ज्येष्ठांकडून उपस्थित होत आहे.
कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर यांच्यासाठी राबविण्यात आला. त्याअनुषंगाने लसीकरणाचे पहिले व दुसरे डाेस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच आता शहरी भागात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे निकष, अटी पूर्ण करणाऱ्या शहरी भागातील सहा खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या सहा रुग्णालयांना लसीकरणासाठी दाेन हजार डोस उपलब्ध केले आहेत. लसीकरणासाठी वेबसाईटवर नोंदणी अनिवार्य आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग केवळ शहरी भागातच नसून, ग्रामीण भागातही असल्याने ज्येष्ठांसह सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ज्येष्ठांची होत आहे.
-------------------
या सहा खासगी रुग्णालयांत २५० रुपयांत मिळते लस
मार्डी मार्गावरील साने गुरूजी अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल
वालकट कम्पाऊंड येथील डॉ. हेमंत मुरके यांचे आरोग्यम् इन्स्टिट्यूट
खापर्डे बगीचा चौधरी हॉस्पिटल
शंकरनगर येथील सुजान सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटल
राजापेठ येथील डॉ. बोंडे हायटेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
राजापेठ येथील डॉ. गजभिये यांचे मातृछाया हॉस्पिटल
---------------------
येथे मिळते कोरोनाची मोफत लस
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महापालिका दवाखाना (भाजीबाजार), आयसोलेशन दवाखाना (दसरा मैदान), शहरी आरोग्य केंद्र (दस्तुरनगर), शहरी आरोग्य केंद्र (महेंद्र कॉलनी), महापालिका शाळा (नागपुरी गेट) व मोदी दवाखाना (नवीवस्ती, बडनेरा)
--------------
आतापर्यंत एकूण झालेले लसीकरण
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक : २९३८
४५ वर्षांवरील को-मोर्बेडिटी रुग्ण : ३२५
हेल्थ केअर वर्कर : १७७४२
फ्रंट लाईन वर्कर : १०४१६
-------------------
३६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरणासाठी प्रस्ताव
जिल्ह्यातील ४९ पैकी ३६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत ग्रामीण भागात लसीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन आरोग्य केंद्रांत लसीकरणाची सोय उपलब्ध होईल, अशी तयारी करण्यात येत आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. एका केंद्रात दोन हजार डाेजची व्यवस्था केली जात आहे. ग्रामीण भागासाठी किमान ७२ हजार लसी लागणार असून, एक लाख डोजची मागणी केली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
------------------
जिल्ह्यातील १४ ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. सोमवारपासून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू होईल, असे संकेत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तशी तयारी केल्याची माहिती आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावतती.
------------------
अगोदर ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. आताही अचलपूर, अंजनगाव सुर्जी येथे कोरोना वेगाने वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तात्काळ लसीकरण मोहीम सुरू व्हावी.
- देवराव वानखडे, अचलपूर.