अंजनगाव सुर्जी : स्थानिक पान अटाई भागात गाजावाजा करून स्थापन केलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेला मागील दोन महिन्यांपासून कुलूप लागलेले असून या पतसंस्थेत पैसे गुंतविलेले ग्राहक पतसंस्थेच्या कुलुपाला दररोज पाहून हिरमुसले होऊन निघून जातात. या पतसंस्थेने बेजबाबदारपणे ग्राहकांना कोणतीही माहिती न देता अथवा पतसंस्थेच्या दारावर कोणतेही नोटीस न लावता मौन धारण करून कार्यालय बंद केले आहे. या पतसंस्थेच्या कार्यालयात येथील भागधारकांचे अडीच कोटी रूपयांवर रक्कम जमा असल्याचे माहितीअंती समजले. याप्रकरणी गुरुवार १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता बारा गुंतवणूकदारांनी अंजनगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.दोन दिवसांपूर्वी स्पेशल गाडी करून काही गुंतवणूकदारांनी या पत संस्थेचे जळगाव खान्देश येथील मुख्य कार्यालय गाठले व आपल्या रक्कमेबद्दल चौकशी केली. अजिंठा मार्गावरील एमआयडीसी जळगाव येथे रेमण्ड चौफुलीवर असलेल्या या संस्थेच्या व्यवस्थापकाने मात्र सर्वांची निराशा केली. जास्तच गरज असेल तर आमच्या संस्थेच्या मालकाचे जळगाव येथील प्लॉट खरेदी करा, अशीही आॅफर गुंतवणूकदारांना देण्यात आली.साडेतेरा टक्के घसघशीत व्याजदराचे आमिष दाखवून व शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांची नावे पुढे करून आणि या नागरिकांना स्थानिक संचालक करून पतसंस्थेने शहरात मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा केली. सधन कास्तकार, व्यापारी, शिक्षक यासोबतच मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तींनीही या शाखेत पैसे जमा केले. शहरातील दुसऱ्या एका पतसंस्थेचे संचालक असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाने केवळ ठेवीचा व्याजदर जास्त आहे म्हणून या पतसंस्थेत अकरा लाख रूपये जमा केले. पतसंस्थेने मात्र गोळा करून मद्रासी अण्णा पॅटर्न गावातून पोबारा केला. ही पतसंस्था मल्टीस्टेट असल्यामुळे राज्याबाहेरही पतसंस्थेच्या शाखा आहेत. तेथील घोटाळ्यांची शिक्षा मात्र शहरातील गुंतवणुकदारांना भोगावी लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)
भाईचंद हिराचंद पतसंस्थेला दोन महिन्यांपासून कुलूप
By admin | Updated: September 18, 2014 23:28 IST