नरेंद्र जावरे - चिखलदरारूग्णालय म्हटले की, रूग्णांंवर उपचार करून त्यांच्या वेदना कमी करण्याचे ठिकाण असे चित्र समोर येते. परंतु अतिदुर्गम चुरणी येथील ग्रामीण रूग्णालयातील घाण उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांनाच आजारी करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे चुरणी येथील ग्रामीण रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. रूग्णालयाच्या आवारात पसरलेले घाणीचे साम्राज्य आणि येथील डॉक्टरांच्या उर्मट वागणुकीला रूग्ण वैतागले आहेत. मेळघाटातील कुपोषणाची स्थिती पाहता येथील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे छातीठोकपणे सांगितले जाते. परंतु सतत टीकेचे केंद्र ठरलेले चुरणी येथील ग्रामीण रूग्णालय या कल्पनेला छेद देणारे आहे. जवळपास दोन कोटी रूपये खर्च करून अतिदुुर्गम हातरू, चुरणी, काटकुंभ या पट्ट्यातील जवळपास ५२ गावांतील हजारो नागरिकांसाठी चुरणीचे रूग्णालय अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु निर्मितीपासूनच हे प्राथमिक आरोग्य केंद्र सतत टीकेचे केंद्र ठरले आहे. यंत्रसामग्री भंगार अवस्थेत रूग्णांवर योग्य उपचार व्हावेत, यासाठी येथील दवाखान्यात क्ष-किरण यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु हे यंत्र कायमचे बंद आहे. एक्स-रे साठी आदिवासींना शंभर ते दीडशे किलोमीटर परतवाडा येथे पाठविले जाते. शासनाच्या मोफत आरोग्य सुविधेचा लाभ आदिवासींना वेळेवर मिळत नसल्याचे संतापजनक चित्र आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची हजेरी घेणारी बायोमेट्रिक प्रणाली बंद आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ मेळघाटात येण्यास तयार नसल्याची जुनी ओरड आहे. त्यामुळे आदिवासींचा वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील अधिकारी शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला सापत्न वागणूक देत आहेत. चुरणी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार तत्काळ थांबविण्यात यावा, अन्य तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसचे राहुल येवले, गौरव काळे, अमोल बोरेकार, पियुष मालवीय, सुनील कासदेकर, संतोष गायन, सागर व्यास आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. हे रुग्णालय ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सोईचे असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
आदिवासी रुग्णांना मरणयातना
By admin | Updated: July 20, 2014 23:58 IST