अमरावती : आदिवासी समाजाच्या आरक्षणावर अतिक्रमणाचा घाट राजकीय स्तरावर रचला जात असल्याने आदिवासींच्या आरक्षण बचावासाठी शनिवारी विभागातील हजारो आदिवासी समाज बांधवांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करुन या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले.घटनेने दिलेल्या अधिकाऱ्यानुसार आदिवासींना मिळालेल्या हक्काच्या आरक्षणात दुसऱ्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली राज्य व केंद्र स्तरावर सुुरू आहे. दऱ्याखोऱ्यात राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणात दुसऱ्या जातींचा समावेश करण्याचा प्रयत्न काही महिन्यांपासून सुरु आहे. हा प्रकार आदिवासींवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे आदिवासींच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ नये, असा इशारा शासनाला देण्यासाठी सायन्सकोर मैदानावरून हजारो आदिवासींनी पारंपरिक वेशभूषेत मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. या मोर्चात शासन व प्रशासनाविरोधात आदिवासींनी घोषणा देत रोष व्यक्त केला. कुठल्याही परिस्थितीत आदिवासींच्या आरक्षणाला हात लावूता कामा नये अन्यथा याचे गंभीर परिणाम राज्यकर्त्यांना भोगावे लागतील, असा इशारा देऊन आदिवासी बांधवांनी जिल्हा कचेरीवर धडक देऊन एकजुटीचा संदेश दिला. दरम्यान मोर्चेकरीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देऊन आदिवासींच्या भावना शासन दरबारी पोहचविण्याची मागणी केली. यासंदर्भात योग्य तो पाठपुरावा वरिष्ठ स्तरावर करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्चेकरांना दिले. यामध्ये कृती समिती, आॅल इंडिया एम्पलॉईज फेडरेशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी युवा क्रांती दल, आदिवासी फासे पारधी संघटना, अखिल भारतीय युवा सेल, आदिवासी हलबा, हलबी समाज संघ यांचेसह आदिवासी समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. सर्वाधिक मोठा मोर्चा असताना पोलिसांचा कडक बंदोबस्त अपूर्ण होता. त्यामुळे मोर्चेकरींना सांभाळताना पोलीस प्रशासनाला कसरत करावी लागली.
आदिवासींचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By admin | Updated: August 30, 2014 23:20 IST