अमरावती : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया १८ मे पासून सुरू झाली आहे. बदली प्रक्रियेच्या दुसर्या दिवशी जिल्हा परिषदेच्या पाच विभागातील कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ‘ऑनलाईन’ पध्दतीने पार पडली. जिल्हा परिषदेतील बदलीपात्र कर्मचार्यांच्या प्रशासकीय, आपसी आणि विनंती अशा विविध प्रकारच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनात आणि कृषी सभापती महेंद्रसिंग गैलवार, वित्त सभापती मनोहर सुने यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी कृषी विभागातील पाच कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये चार कृषी अधिकारी व एका विस्तार अधिकार्याची बदली करण्यात आली. वित्त विभागातील एकूण ११ कर्मचार्यांच्या जिल्हय़ांतर्गत बदल्या केल्या आहेत. यामध्ये दोन वरिष्ठ सहायक आणि दोन कनिष्ठ सहायकांची प्रशासकीय बदली करण्यात आली. तसेच २ सहायक लेखाधिकारी, एक कनिष्ठ लेखा अधिकार्यांची आणि दोन वरिष्ठ सहायकांची विनंती बदली करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागातील दोन पशुसंवर्धन विकास अधिकारी व दोन पशुधन पर्यवेक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. सिंचन विभागातील एका कनिष्ठ अभियंत्याची प्रशासकीय आणि तीन कर्मचार्यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली प्रक्रियेच्या रविवार या पहिल्या दिवशी महिला बालकल्याण, बांधकाम विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सोमवारी एकूण पाच विभागातील २५ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान वित्त विभागाचे प्रमुख चंद्रशेखर खंडारे, किशोर गुल्हाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.डब्ल्यू. दिवाण, पशुसंवर्धन अधिकारी सोळंके, कृषी अधिकारी दिलीप काकडेंसह पंकज गुल्हाने, ऋषीकेश कोकाटे व बदलीपात्र कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत पाच विभागांतील कर्मचार्यांच्या बदल्या
By admin | Updated: May 19, 2014 23:00 IST